बाराही तालुक्यात होणार रिलेचा प्रवास लगोरीसह सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
यंदा गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या ‘टॉर्च रिले’चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी सकाळी पर्वरीत सचिवालयात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात केले. त्यांच्यासमवेत क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा सचिव स्वेतिका सचन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. गीता नागवेकर तसेच क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे अरविंद खुटकर आदी उपस्थित होते.
आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून इतिहास रचण्यासाठी गोवा सज्ज झाला आहे.
अनेक नवे क्रीडा प्रकार
या स्पर्धेत 43 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. अनेक नवीन खेळांचे पदार्पणही होणार आहे. त्यात बीच फुटबॉल, रोलबॉल, गोल्फ, सॅपेकटॅकरो, स्क्वे मार्शल आर्ट, कलारिपायट्टू आणि पेनकॅक सिलाट या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
नौकानयन, तायक्वांदोचे पुनरागमन
नौकानयन, आणि तायक्वांदो खेळ मागील आवृत्तीत नव्हते, मात्र यंदाच्या स्पर्धेद्वारे ते पुनरागमन करत आहेत. परंपरा आणि संस्कृतीला मान्यता देत, लगोरी आणि गटकाया खेळांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे कार्यक्रमाला एक अनोखा आयाम जोडला गेला आहे.
प्रतिष्ठित स्पर्धेसाठी गोवा सज्ज : मुख्यमंत्री
‘गोव्यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या टॉर्च रिलेची सुरूवात करताना मला खूप अभिमान वाटत आहे. ऐतिहासिक टॉर्च रिले खिलाडीवृत्तीच्या चिरंतन ज्योतीचे प्रतीक असून अॅथलेट्स उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेला मूर्त स्वरूप देते’ असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेच्या सर्वोत्तम आयोजनासाठी गोवा पूर्णपणे तयार आहे, याची खात्री बाळगा, असे डॉ. सावंत म्हणाले.
बाराही तालुक्यातून प्रवास
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीची टॉर्च रिले सर्व 12 तालुक्यांतून प्रवास करेल आणि सर्व प्रमुख पर्यटन संस्थांना भेट देईल. राष्ट्रीय खेळाचा उत्साह वाढवेल, जनजागृती करेल आणि या भव्य कार्यक्रमात ग्रामीण भागांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
देशातील सर्वांत मोठी स्पर्धा
ही टॉर्च रिले 25 ऑक्टोबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर येणार असून 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ‘आम्ही राज्याच्या क्रीडा इतिहासातील निर्णायक क्षणी आहोत. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकडे आम्ही केवळ एक कार्यक्रम म्हणून पाहत नाही तर राज्यासाठी नवसंजीवनी क्रीडा इकोसिस्टमचा रोडमॅप म्हणून पाहत आहोत’ असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यावेळी म्हणाले. सध्याच्या आवृत्तीत विक्रमी संख्येने क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, ही आवृत्ती देशातील आतापर्यंतची सर्वांत मोठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असेल, असे क्रीडामंत्री गावडे म्हणाले.
विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी सहभागी व्हावे
या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवेकरांनी दाखविलेल्या प्रेमांबद्दल मंत्री गावडे यांनी आभार मानले. शालेय विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेचा भाग होण्याचे आवाहन करताना त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनीही त्यांना राष्ट्रीय खेळाचा भाग बनण्यासाठी प्रेरित करावे, असे क्रीडामंत्री गावडे यावेळी म्हणाले.
37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही देशाची प्रतिभा आणि चैतन्य दर्शविणारे खेळाडू आणि एकतेचे एक उल्लेखनीय दर्शन घडवणार आहे. या स्पर्धेत 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 10,000 खेळाडू आणि 2000 अधिकारी सहभागी होतील.









