प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन काकती येथील शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मान्सून पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा वेगवेगळी पिके घेतली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शेतवडीत गुंतवणूक केलेली रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणे कठीण आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे व झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.









