मलानची 107 चेंडूंत 140 धावांची खेळी, रीस टोपलीचे 4 बळी
वृत्तसंस्था/ धर्मशाला
गतविजेत्या इंग्लंडने मंगळवारी येथे बांगलादेशला 137 धावांनी पराभूत करून विश्वचषकात पहिला विजय नोंदवला. डेविड मलानच्या 107 चेंडूंतील 140 धावांच्या खेळीने यास मोलाचा हातभार लावला. आधी 9 बाद 364 धावा अशी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर प्रामुख्याने रीस टोपलीने (43 धावांत 4 बळी) बांगलादेशच्या वरच्या फळीला गारद केल्याने त्यांना 48.1 षटकांत केवळ 227 धावा करता आल्या. लिटन दास (76) आणि मुशफिकर रहीम (51) यांच्या खेळी तेवढ्या बांगलादेशी फलंदाजांच्या निराशाजनक प्रदर्शनात उठून दिसल्या.

इंग्लंडचे फलंदाज मलान, जॉनी बेअरस्टो (52) आणि ज्यो रूट (82) यांनी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर बांगलादेशला सुरुवातीलाच धक्के बसल्याने त्यांची घडी विस्कटली आणि शेवटच्या 18.1 षटकांत ते फक्त 67 धावाच करू शकले तसेच त्यांचे 5 गडी बाद झाले. रीस टोपलीने सुरुवातीलाच तीन धक्कें दिल्याने बांगलादेशची गाडी घसरली आणि त्यांना अधिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. उर्वरित डावात एकीकडे आवश्यक धावसरासरी वाढत चाललेली असताना बांगलादेशकडून प्रतिहल्ल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत.
तनजीद हसन (1) खराब फटका हाणून टोपलीच्या चेंडूवर स्लीपमध्ये झेल देऊन परतला, तर नजमुल हुसेन शांतो पहिल्याच चेंडूवर पॉईंटवर झेल देऊन बाद झाला. त्यानंतर टोपलीने बांगलादेशचा कर्णधार शकीब उल हसनचा (1) त्रिफळा उडवला आणि पहिल्या सहा षटकांत त्यांची 3 बाद 26 अशी बिकट अवस्था झाली. वरच्या फळीचा धुव्वा उडालेला असताना दासने एकाकी झुंज देत 66 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह 76 धावा केल्या आणि रहीमसह पाचव्या यष्टीसाठी 72 धावा जोडल्या.
रहीमने नांगर घालून राहणे पसंत केले आणि डावाचा वेग वाढविण्याचे कोणतेही प्रयत्न त्यात दिसून आले नाहीत. 4 चौकारांसह 64 चेंडूंत 51 धावा केल्यानंतर टोपलीने त्याला थर्ड मॅनकडे झेल देण्यास भाग पाडले. तौहीद हृदॉयच्या (61 चेंडूंत 39 धावा, 2 चौकार) डावातही आक्रमणाचा हेतू दिसला नाही. रहीम 31 व्या षटकानंतर बाद झाला तेव्हा बांगलादेश 164 धावांवर होता. तेथून 200 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्यांना 43 वे षटक लागले आणि लवकरच त्यांचा डाव संपुष्टात आला.
तत्पूर्वी, मलानने आपली स्वप्नवत घोडदौड सुरू ठेवताना बांगलादेशविऊद्ध शतक झळकावल्याने इंग्लंडला 9 बाद 364 धावांपर्यंत मजल मारण्यास मोलाची मदत झाली. बांगलादेशने आधी गोलंदाजी टाकणे पसंत केल्यानंतर सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडविऊद्ध फारशा न चमकलेल्या मलानची 107 चेंडूंतील 140 धावांची खेळी इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येची आधारस्तंभ ठरली. अफगाणिस्तानविऊद्ध मागील सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली होती. त्याची पुनरावृत्ती त्यांना करता आली नाही.
मलानने पहिल्या यष्टीसाठी जॉनी बेअरस्टोसमवेत (59 चेंडूंत 52 धावा) 115 धावा जोडल्या आणि ज्यो रूटसह (68 चेंडूंत 82 धावा) अवघ्या 19.3 षटकांत आणखी 151 धावा जोडल्या. बांगलादेशच्या गोलंदाजांनी डावाच्या शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात पुनरागमन करून इंग्लंडने 68 धावांत सात फलंदाज गमावले. त्यामुळे त्यांना 400 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
संक्षिप्त धावफलक-इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 364 (बेअरस्टो 52, मलान 140, रूट 82, बटलर 20, ब्रूक 20, तस्किन अहमद 1-38, शरिफुल इस्लाम 3-75, मेहदी हसन 4-71, शकिब उल हसन 1-52), बांगलादेश सर्वबाद 227 (लिटन दास 76, मुशफिकुर रहीम 51, तौहिद ह्रदॉय 39, मेहदी हसन 14, तस्किन अहमद 15, वोक्स 2-49, टोपली 4-43, करन 1-47, वूड 1-29, रशिद 1-42, लिव्हिंगस्टोन 1-13)









