मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पासाठी अर्थसंकल्पपूर्व बैठकांना प्रारंभ केला आहे. या बैठका 14 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. विविध मंत्रालयांसोबतच्या बैठकांमध्ये अर्थ मंत्रालय 2023-24 चा सुधारित अनुमान आणि 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अनुमानाला अंतिम स्वरुप देणार आहे.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सीतारामन यांनी जुलै 2019 मध्ये पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडला होता. 2024-25 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होण्याची अपेक्षा आहे.
अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अर्थमंत्री संबंधित घटकांचे प्रस्ताव आणि मागण्या जाणून घेणार आहेत. यात राज्यांचे प्रतिनिधी, बँकर, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ आणि कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सामील असतील. अर्थसंकल्पपूर्व बैठका समाप्त झाल्यावर अर्थमंत्री सर्व मागण्यांवर अंतिम निर्णय घेतात. अर्थसंकल्पला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी अर्थमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करतात.