मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आप राज्यसभा खासदार संजय सिंह यांची ईडी कोठडी न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. सिंह यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने चार ऑक्टोबर रोजी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी 5 दिवसांच्या ईडी कोठडीत करण्यात आली होती. कोठडी संपल्यावर ईडीने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते.
मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी ईडीने संजय सिंह यांच्या 5 दिवांच्या कोठडीची मागणी केली होती. संजय सिंह हे चौकशीत सहकार्य करत नाहीत. मोबाइलच्या डाटाबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला.
एका उद्योजकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर अलिकडेच चंदीगडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत महत्त्वाची माहिती मिळाली असून याचा खुलासा आताच करता येणार नसल्याचे ईडीच्या वकिलाने सांगितले आहे. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाली असल्याने अधिक तपासाकरता कोठडी आवश्यक असल्याचे ईडीकडून न्यायालयाला सांगण्यात आले.
ईडीला कोठडी मागण्याचा कुठलाच अधिकार नाही. कोठडीकरता तपास यंत्रणेकडे ठोस पुरावे असणे आवश्यक आहे. मागील 5 दिवसांमध्ये ईडीने तपासाशी संबंधित नसलेले प्रश्न विचारले आहेत. सर्वेश अन् विवेक या आरोपींसमोर बसून संजय सिंह यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही असा दावा संजय सिंह यांच्या वकील रेबेका जॉन यांनी केला आहे.









