संपर्कव्यवस्था बहाल करण्याचे काम सुरू : चुंगथांगमध्ये पूल निर्माण : राज्य सरकारने मागितली इस्रोकडून मदत
वृत्तसंस्था/ गंगटोक
सिक्कीममध्ये 3 ऑक्टोबर रोजी ढगफुटी झाल्याने लहोनक आणि शाको चू सरोवर फुटले आणि यामुळे तीस्ता नदीला पूर आला होता. या पूरामुळे मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची येथे मोठे नुकसान झाले होते. पुराला 6 दिवस उलटल्यावर सैन्याने आता राज्यात संपर्कव्यवस्था बहाल करण्याचे काम हाती घेतले आहे. कामात सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि आयटीबीपीच्या जवानांची मदत मिळत आहे.

तीस्ताच्या पुरामुळे 25 हजार लोक प्रभावित झाले आहेत. 1200 घरे वाहून गेली असून आपत्तीतील बळींची संख्या 74 वर पोहोचली आहे. तर अद्याप 101 लोक बेपत्ता आहेत. सिक्कीममध्ये 23 मृतदेह सापडले असून सैन्याच्या 8 जवानांचे मृतदेह पश्चिम बंगालमध्ये आढळले आहेत. पूराच्या पाण्यात वाहून आलेले 41 मृतदेह मिळाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीच्या जिल्हाधिकारी परवीन शर्मा यांनी दिली आहे.
सैन्याकडून वैद्यकीय-भोजन सुविधा
सर्वाधिक नुकसान झेललेल्या चुंगथांगमध्ये सैन्याने पूल निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या पूलाच्या निर्मितीनंतर तेथे अडकून पडलेले लोक आणि पर्यटकांना बाहेर काढता येणार आहे. सैन्याने 63 विदेशी आणि 2000 देशी पर्यटकांची यादी तयार केली असून त्यांना उपचार, भोजन अन् निवारा देण्यात आला आहे.
600 लोकांना केले एअरलिफ्ट
मंगन जिल्ह्यातील लाचेन आणि लाचुंग गावांमध्ये अडकून पडलेल्या 600 लोकांना सोमवारी एअरलिफ्ट करण्यात आले होते. यात विदेशी पर्यटक, स्थानिक लोक आणि कामगार देखील सामील होते. बचावकार्यात भारतीय वायुदलाची एम8, एफ4, एफ7, सी2, एमआय17 आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात आहे. मंगळवारी देखील हेलिकॉप्टरद्वारे लोकांना हलविण्यात आल्याची माहिती सैन्याने दिली आहे.
इस्रोच्या यंत्रणेची मदत घेणार
सिक्कीम सरकारने लहोनक आणि शाको चू सरोवरावर नजर ठेवण्यासाठी इस्रोशी संपर्क साधला आहे. याद्वारे आणखी एक आपत्ती टाळता येणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव व्ही.बी. पाठक यांनी केंद्रीय मुख्य सचिव राजीव गौबा यांनी सांगितले आहे. दूरसंचार सेवेअभावी मदत अन् बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. परंतु बीएसएनएल दूरसंचार सेवा बहाल करण्यासाठी सैन्यासोबत 5 व्हीसॅट युनिट आणि तंत्रज्ञांना हेलिकॉप्टरद्वारे लाचेन, लाचुंग, चुंगथांग, चॅटन आणि थेंग येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पाठक यांनी दिली आहे.
तीस्ता नदीतील पूर
ढगफुटी झाल्यावर वाढलेली पाणीपातळी सरोवराला रोखता आली नाही. यामुळे तीस्ता नदीला मोठा पूर आला. नदीची पातळी 15-20 फूटांपर्यंत वाढल्याने नदीच्या काठावरील सैन्यशिबिरही वाहून गेले आणि तेथे उभी असलेली 41 वाहने पाण्यात बुडाली. तसेच केवळ 10 सेकंदात 13 हजार कोटी रुपयांचे तीस्ता-3 जलविद्युत प्रकल्पाचे 60 मीटर उंचीचे धरण पूर्णपणे वाहून गेले आहे. तर दिखचू, सिंगतम आणि रांगपो शहर पाण्यात बुडाले होते. पूरात सिक्कीमला देशाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 10 देखील वाहून गेला.
सिक्कीममधील सद्यस्थिती
-लाचेनमध्sय लोक एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेला सामोरे जात आहेत, वीजपुरवठा अद्याप ठप्प
-तीस्ता खोरे शस्त्रास्त्रs, दारूगोळा आणि स्फोटकांनी भरून गेले आहे.
-81 परप्रांतीय कामगारांना रेगु, टूंग आणि चुंगथांगमधून सिलिगुडी येथे हलविले









