नव्या चित्रपटाची झाली घोषणा
राजकुमार रावने चित्रपटक्षेत्राशी निगडित कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वत:ची मेहनत अन् अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. राजकुमार राव हा आगामी काळात अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. अशा स्थितीत त्याच्या खात्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. या चित्रपटाचे नाव ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करणार आहेत. राज शांडिल्य यांनी यापूर्वी ड्रीम गर्ल आणि ड्रीम गर्ल 2 या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

टी-सीरिजने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. भूतकाळाचा एक धमाका, कौटुंबिक ड्रामा ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’द्वारे राजकुमार आणि तृप्ति 90 च्या दशकातील आठवणी जागविण्यासाठी येत आहेत, असे टी-सीरिजने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या नव्या चित्रपटाची कहाणी राज शांडिल्य यांनीच लिहिली आहे.
शांडिल्य हे प्रख्यात टेलिव्हिजन आणि फिल्म रायटर आहेत. त्यांनी स्वत:ची कारकीर्द 2006 मध्ये सुरू केली होती. शांडिल्य यांनी कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीसाठी सुमारे 350 स्क्रिप्ट्स आणि कपिल शर्मासाठी सुमारे 20 स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत. राजकुमार आगामी काळात अनेक चित्रपटामंध्ये दिसून येईल.









