नवी दिल्ली :
आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात 86 हजार 234 कोटी रुपयांची भर पडली असल्याचे समजते. यामध्ये सर्वाधिक बाजार भांडवल मूल्य वाढीत टीसीएस अग्रस्थानी राहिली आहे.
टीसीएससोबत एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि बजाज फायनान्स यांच्या भांडवलात मागच्या आठवड्यात वाढ झाली होती. तर रिलायन्स इंडस्ट्रिज, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एसबीआय आणि भारती एअरटेल यांच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र घट झाली होते. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 167 अंकांनी वाढला होता. आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 32,730.22 कोटी रुपयांनी वाढून 13,24,649.78 कोटी रुपयांवर पोहचले आहे. बजाज फायनान्स कंपनीने आपल्या बाजार भांडवलात 21,697.96 कोटी रुपयांची भर घातली होती. कंपनीचे बाजारभांडवल मूल्य 4,94,884.37 कोटी रुपयांवर पोहचले आहे. इन्फोसिसचे बाजार भांडवल 18,057.94 कोटी रुपयांनी वाढत 6,13,655.04 कोटी रुपयांवर पोहचले आहे.









