प्रज्ञा मणेरीकर /पणजी
‘डाकिया डाक लाया खुशी का पैगाम कही दर्दनाक लाया’ हे गाणं प्रत्येकाला पोस्टाच्या काळात घेऊन जाते. शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचे सर्वात सोपे आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाहीतर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. एक टपाल सेवा देशाच्या संपर्काचा आधार मानला जातो आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील महत्त्वाची भूमिका बजावतो. आज 10 ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल दिन. टपालाच्या महत्त्वाच्या भूमिकेबाबत जागृती करण्याकरिता हा दिन साजरा करण्यात येतो.
इंटरनेट युगात अजूनही पोस्टाचे महत्त्व कायम
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून सर्वत्र इंटरनेटचे वर्चस्व आहे. 1990 च्या दशकात आलेल्या या इंटरनेट सेवेमुळे 120 वर्षांपासून सुरू असलेली टपाल व्यवस्था संपुष्टात येईल, असे भाकीत केले जात होते. इंटरनेटमुळे संवादाची परिभाषा बदलली, परंतु टपाल व्यवस्था अजूनही संपुष्टात आलेली नाही. इंटरनेटच्या या युगात आजही पोस्टाचे महत्त्व कायम आहे. जगात ई-कॉमर्स कंपन्या, कुरीअर आणि पार्सल सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डिजीटायझेशनमुळे लोक आपली वस्तू पाठवण्यासाठी नवनवीन माध्यमांचा वापर करू लागले आहे. असे असले तरी समाजात टपाल सेवेचे महत्त्व आजही पूर्वीसारखेच कायम आहे. बदलत्या युगाप्रमाणे पोस्टने त्याचे नवीन रूप धारण केले आहे. आज, पोस्टल सेवांमध्ये वैयक्तिक पत्रे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांव्यतिरिक्त ई-कॉमर्स आणि ऑनलाइन शॉपिंग पॅकेज वितरण प्रणाली समाविष्ट आहे. इंटरनेटच्या आगमनाने, या सेवांचे स्वरूप बरेच बदलले आहे.
सर्वात मोठी टपालसेवेचे नेटवर्क म्हणून भारतीय टपालाची ओळख
भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुऊवात 1852 साली सिंध जिल्ह्यामध्ये झाली तर 1854पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटाचे प्रचलन सुरू झाले. पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 साली निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा होता. त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल सुरू झाली. 150 वर्षाहून अधिक काळ जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे नेटवर्क म्हणून भारतीय टपाल कार्यालयाची ओळख आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन स्पीड पोस्ट, ई-पोस्ट यासारख्या अनेक सेवा खात्याने सुरू केल्या आहेत. मुंबईतील टपाल कार्यालय हे देशातील सर्वात मोठे कार्यालय असून 1794 साली या कार्यालयाची स्थापना झाली.
एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजे होते सर्वकाही
एक काळ असा होता की जेव्हा लोक दिवस रात्र पत्रांची वाट पहात असे. 25 ते 30 वर्षांपूर्वी टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते. पत्रास कारण की… या वाक्याने सुऊवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळवायची. नातेवाईकांच्या खुशालीची वाट पाहायची. मात्र काळाच्या ओघात ही पत्रे आता हितास जमा झाली आहेत. पूर्वी खुशाली कळवायची म्हटलं की, पत्राशिवाय पर्याय नव्हता. बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येत असल्यामुळे आजच्या युवापिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटींगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही होते. परंतु आता सोशल मीडीयाच्या जमान्यात पोस्टाच्या पत्रातील सप्रेम नमस्कार, विनंती विशेष हा मायना नव्या पिढीला माहिती असेल हे सांगणे जरा कठीणच आहे.
प्राचीन काळापासून संपर्कासाठी पत्राचा वापर
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र चिठ्ठी म्हणून कबुतरामार्फत पाठविले जाई तर काही दुतांमार्फत. यामध्ये विशेषत: राजे, महाराजे मनुष्याच्या साहाय्याने संदेशवहन करीत असत. यासाठी बराच कालावधी जात असे. पत्राद्वारे संदेशवहन हे संवाद माध्यमातील क्रांतीकारी पाऊल होते. यानंतर संवाद माध्यमात जागतिक स्तरावर अनेक बदल आणि प्रगती होत गेली. बदलत्या जमान्यानुसार काळानुरूप बदलाचे आव्हान टपाल विभागाने स्वीकारून नवनवे उपक्रम हाती घेतले आहेत.









