10 वर्षे उलटली तरी घरे देण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : घरे देतो म्हणून 2012-13 साली आमच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये महापालिकेने जमा करून घेतले आहेत. मात्र 10 वर्षे उलटली तरी अजूनही आम्हाला घरे देण्यात आली नाहीत. तरी तातडीने घरे द्यावीत, या मागणीसाठी शहापूर, वडगाव, अनगोळ, मजगाव येथील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले. वाजपेयी वसती योजनेंतर्गत जीप्लस3 अशा इमारती उभारून घरे देणार असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आमच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये रकमही घेतली आहे. जवळपास 300 हून अधिक जणांनी रक्कम भरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाडोत्री घरात राहत आहे. घरे नसल्यामुळे आम्हाला भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे विविध सोसायटी व बँकांमधून कर्ज काढून वरील रक्कम भरलो होतो. मात्र 10 वर्षे उलटली तरी अद्याप आम्हाला घरे दिली गेली नाहीत. यापूर्वी अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मात्र केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. यामुळे आम्ही बेघर होऊन राहत आहोत. सरकारकडून 4 लाख रुपये दिले जाणार आहेत. ती रक्कम आम्हाला कर्ज म्हणून देण्यात येणार आहे. त्यानंतर त्या रकमेचे हप्ते भरावे लागणार आहेत. ते हप्ते भरण्यास आम्ही तयार आहोत. मात्र घरे बांधून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश कम्मार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









