अतिवृष्टीमुळे घरे कोसळल्याचा खोटा अहवाल : भ्रष्ट पीडीओ, कार्यदर्शीकडे जि. पं. लक्ष देणार का?
अगसगे : तालुक्यातील हंदिगनूर ग्राम पंचायत परिसरात अतिवृष्टीमुळे चाळीसहून अधिक घरे कोसळल्याचा खोटा अहवाल तयार केला असून, एक लाख द्या. हवे तर पाच लाख घ्या असा धक्कादायक फतवा हंदिगनूर ग्राम पंचायतीचे काही सदस्य, ग्रामविकास अधिकारी हरिष बडिगेर, कार्यदर्शी रंजीत सांवी यांनी काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. या खोट्या अहवालाचा तपास जिल्हा पंचायत अधिकारी करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अतिवृष्टीने घर पूर्ण कोसळले तर संबंधित कुटुंबीयांना शासनाकडून पाच लाख रुपये दिले जातात. यावर्षी हंदिगनूरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्येच पाऊस नसल्याने दुष्काळग्रस्त स्थिती बनली आहे. पावसाअभावी पिके वाळू लागली आहेत. मात्र, हंदिगनूर ग्राम पंचायत व्याप्तीमधील गावावर कशी काय अतिवृष्टी झाली अशी चर्चा पंचक्रोशीतील गावामधून होत आहे. एक घर देखील कोसळले नाही. मात्र ग्राम पंचायतीने ‘एक लाख द्या आणि पाच लाखाचा निधी घ्या असा फतवा काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षापूर्वी दमदार पाऊस झाल्याने अनेकांची घरे कोसळली. यामधील बहुतांश लाभार्थींना निधी दिला नाही. ते कुटुंबीय निधी मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. पण आता घरे कोसळलेली नसताना अशा प्रकारे निधी दिला जाणार असल्याचे सांगून एक लाख रुपये उकळण्याचा प्रकार हंदिगनूर ग्राम पंचायतीचे काही सदस्य, पीडीओ व कार्यदर्शीनी चालविला आहे. ग्राम पंचायतीमध्ये अनेक कामे न करताच निधी काढला आहे. यावरुन असे दिसून येते की तेथे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
पीडीओ हरीष बडिगेरला पिटाळून लावले
अतिवृष्टीमध्ये घरे कोसळली आहेत असा खोटा अहवाल संबंधित खात्याकडे पाठविला आहे. त्या खोट्या अहवालाच्या नावाची यादी घेऊन रविवार दि. 8 ऑक्टोबर रोजी पीडीओ हरिष बडिगेर हंदिगनूरला जीपीएस करण्यासाठी आले. काही घरांचे जीपीएस करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांना समजताच त्यांनी हरिष बडिगेरना जाब विचारत आज रविवार आहे. सुटीच्या दिवशी जीपीएस का बनवता, ही खोटी यादी कशी बनवली. गावात घरे कोसळली नसताना खोटी यादी कशी बनवली. यासाठी किती लाख रुपये खाल्लेत. तुमच्या विरोधात जि. पं. व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू असे म्हणताच त्यांनी तेथून पळ काढला.
भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा
या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन भ्रष्टाचारी सदस्य व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व योग्य लाभार्थीना शासनाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तालुका पंचायतीकडे तक्रार
अतिवृष्टीच्या बोगस यादीबाबत सोमवारी पीडीओ व कार्यदर्शी यांच्यासह काही सदस्यांची बैठक झाली. यावेळी कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन पाच लाखाची घरे मंजूर करून घ्यावीत अशी चर्चा केली. यावेळी या बोगस अहवालाला ग्राम पंचायत सदस्या अॅड. माधुरी पाटील यांनी विरोध केला. याबाबत तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याकडे तक्रार केली आहे.









