शरद पवार गट बाजू मांडणार : अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सोमवारी अजित पवार गटाने जोरदार युक्तिवाद करत आपलाच गट योग्य असल्याचा दावा केला. याचिकाकर्त्यांचा (अजित पवार गट) युक्तिवाद संपला असून पुढील सुनावणीत शरद पवार गट आपली बाजू मांडणार आहे. अजित पवार गटातर्फे सोमवारी तिघांनी युक्तिवाद केल्यानंतर निवडणूक आयोगानेही काही प्रश्न उपस्थित केला. आता 9 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून शरद पवार गट आपले म्हणणे आयोगासमोर मांडणार असल्याचे निवडणूक आयोगानेच स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रकरण दाखल झाले आहे. जुलैमध्ये अजित पवार गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली. त्याप्रकरणी सोमवारी अजित पवार गटाने जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जात नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एका सहीने नियुक्त्या करत होते, असा आरोप अजित पवार गटाने केला. शरद पवार घर चालवायचे, तसा पक्ष चालवत होते. त्यांनी नियम पायदळी तुडवले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला.
शरद पवार गटाला दिलासा
अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यानंतर निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी भूमिका मांडली. याचदरम्यान, निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला यापूर्वी संधी दिल्यामुळे त्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी विनंती अजित पवार गटाने केली. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी अजित पवार गटाची विनंती फेटाळत शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली. तसेच याप्रकरणी आता अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. पुढच्या सुनावणीवेळी 9 नोव्हेंबरला शरद पवार गटाकडून युक्तिवाद ऐकला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. आता अजित पवार गटाच्या युक्तिवादाला पुराव्यानिशी खोडून काढणे हे शरद पवार गटाच्या वकिलांसाठी आव्हान असणार आहे.
अजित पवार गटाची मागणी फेटाळली : सिंघवी
निवडणूक आयोगातील सुनावणी पार पडल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला. याचिकाकर्त्यांकडून घाई करण्याबाबत निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले. आमचा अजून युक्तिवाद सुऊ झालेला नाही. आम्हाला 9 हजार प्रतिज्ञापत्र त्रुटी आढळल्या आहेत. या सुनावणीला लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच आमच्या युक्तिवादाला वेळ न देण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न होता, पण त्यांचा तो प्रयत्न निवडणूक आयोगाने धुडकावून लावलाय, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.









