कार्यकारिणी बैठकीनंतर राहुल गांधींची माहिती : भाजपवर दबाव आणण्याचीही तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस कार्यकारिणीने जातिनिहाय जनगणनेच्या कल्पनेच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सांगितले. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राहुल यांनी पत्रकारांना संबोधित केले. विरोधी आघाडी ‘इंडिया’मधील बहुतांश घटक जातिनिहाय जनगणनेच्या बाजूने आहेत. त्यानंतर आता काँग्रेस कार्यकारिणीने ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच जात जनगणनेसाठी काँग्रेस भाजपवर जोरदार दबाव आणणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस कार्यकारिणीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जात-आधारित जनगणना आणि निवडणूक रणनीती आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्यासह अनेक पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत जात जनगणनेवर एकमताने सहमती दर्शवण्यात आली. राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशसह इतर काँग्रेसशासित राज्यांमध्ये जात जनगणनेसाठी पुढचे पाऊल टाकले जाईल. तसेच याबाबत भाजपवरही दबाव आणणार आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले. हा राजकीय निर्णय नाही, तर न्यायाचा निर्णय आहे. जातिनिहाय जनगणना करण्यात भाजप ‘अक्षम’ असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप ओबीसी वर्गासाठी काम करत नसून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही माजी काँग्रेस अध्यक्षांनी केला. जातीवर आधारित जनगणना ही ‘एक्स-रे’ सारखी असल्यामुळे ओबीसी आणि इतर वर्गांची स्थिती जाणून घेण्यास मदत होईल. भाजपला हा ‘एक्स-रे’ का नको, असा सवाल राहुल गांधींनी केला.
आमच्या चारपैकी तीन मुख्यमंत्री इतर मागासवर्गीयमधून (ओबीसी) आलेले आहेत. त्याचवेळी, भाजपच्या दहापैकी फक्त एक मुख्यमंत्री ओबीसी समाजातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसींसाठी काम करत नसून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, असा दावा त्यांनी केला.#
विधानसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले?
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे. मध्यप्रदेशात भाजपचे सरकार जाणार आहे. तेलंगणातही आपले (भारत राष्ट्र समिती) सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पुनर्रचित कार्यसमितीची ही दुसरी बैठक होती. काँग्रेस कार्यकारिणीची यापूर्वीची बैठक 16 आणि 17 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये झाली होती. कार्यकारिणीच्या पुनर्रचनेनंतरची ही पहिलीच बैठक होती.









