रशिया-युक्रेन युद्धाची धग कमी झाल्याने जागतिक स्थिती पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असतानाच इस्राईल आणि ‘हमास’ या दहशतवादी संघटनेमध्ये नव्याने संघर्ष पेटल्याने जगापुढे आता आणखी एक संकट उभे राहिले आहे. हमासने इस्राईलवर चढविलेला हल्लाबोल, प्रत्युत्तरादाखल इस्राईलने गाझापट्टीवर केलेला बॉम्बवर्षाव यामुळे मागच्या दोन ते तीन दिवसांत युद्धाचा भडका उडाला असून, याचे एकूणच जगाच्या राजकारण, अर्थकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरे तर हा संघर्ष नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडेसे इतिहासात डोकावावे लागेल. युरोपात ज्यूंचा प्रचंड नरसंहार झाला. यात जवळपास 42 लाख ज्यूंची कत्तल झाली, असे म्हणतात. त्यानंतर ज्यू नागरिकांनी मिळेल, त्या देशात आसरा घेतला. ज्यूंची ही फरफट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव देण्यात आल्यानंतर युनोने इस्राईलच्या बाजूने प्रस्तावास मान्यता दिली व इस्राईलचा उदय झाला. तेव्हापासून इस्राईल हा ज्यू लोकांची वस्ती असलेला पश्चिम आशियातील देश ओळखला जातो. या देशाच्या पूर्वेकडील भागास वेस्ट बँक असे म्हटले जाते. तेथे ‘पॅलेस्टाईन नॅशनल अॅथॉरिटी’कडून पॅलेस्टिनी नागरिकांकरिता सरकार चालविले असून, त्यास संयुक्त राष्ट्रांकडून मंजुरी देण्यात आली आहे. इस्राईलमध्ये ज्यू बहुसंख्य, तर पॅलेस्टाईनमध्ये अरब बहुसंख्य आहेत, अशी स्थिती आहे. एकूणच वर्चस्वासाठीचा हा संघर्ष असून, त्याला आठ ते दहा दशकांचा इतिहास आहे. इस्राईलच्या नैत्यकडील भाग एका पट्टीसदृश भूप्रदेश आहे. या देशाच्या दोन बाजूंना इस्राईल, एका बाजूस भूमध्य समुद्र, तर दुसऱ्या बाजूस इजिप्तची सीमा आहे. हीच ती जगप्रसिद्ध ‘गाझा पट्टी’ होय. या गाझा पट्टीवर हमास या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. गाझामधून इस्राईलने 2005 मध्ये आपले सैन्य माघारी घेतले. त्यानंतर हमासने गाझावर कब्जा मिळविला व निवडणूक जिंकत या भागावर 2007 पासून आपले संपूर्ण वर्चस्व मिळविले. तर दुसरीकडे इस्राईलने या भागावर निर्बंध लावण्याची भूमिका घेतली. तेव्हापासून गाझावरून इस्राईल व हमासमध्ये सातत्याने संघर्ष झडत राहिले आहेत. गाझा पट्टी व वेस्ट बँक या भागात स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य म्हणून मान्यता मिळावी, अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे. मात्र, इस्राईलने या मागणीला कायम विरोध केला आहे. सांप्रत संघर्षालाही हीच बाजू आहे. किंबहुना, या खेपेला हमासने इस्राईलवर केलेला हल्ला हा काहीसा धक्कादायकच म्हणावा लागेल. मागच्या काही वर्षांत इस्राईलने आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला वरचष्मा दाखवून दिला आहे. इस्राईली संरक्षण यंत्रणेचा जगभर बोलबाला आहे. असे असताना हमासचे दहशतवादी गाझा पट्टीतून इस्राईलच्या दिशेने दोन हजारांहून अधिक रॉकेट डागेपर्यंत त्याची पुसटशी कल्पनाही इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणेस येऊ नये, हे काहीसे आश्चर्यकारकच. हमासच्या हल्ल्याची पद्धत पाहता याचे नियोजन हे खूप आधीपासून झालेले असणार, यालाच पुष्टी मिळते. एकीकडे हवाई हल्ले सुरू करायचे नि दुसरीकडे जमीन, समुद्र, हवेतून घुसखोरी करायची, अगदी पॅराग्लायडिंगच्या तंत्राचाही उपयोग करायचा नि इस्राईलच्या लष्कराला गोंधळात टाकायचे, अशीच ही रणनीती दिसते. यात काही प्रमाणात का होईना त्यांना यश आल्याचे दिसून येते. वास्तविक, दक्षिणेकडील भागात हे हल्ले झाले, तो इस्राईलचा बालेकिल्ला मानला जातो. अत्याधुनिक कुंपण, अत्याधुनिक पॅमेऱ्यांची नजर व शस्त्रसज्ज सैनिकांचा खडा पहारा असतानाही ही सगळी यंत्रणा हमासचे अतिरेकी भेदून टाकत असतील, तर सुरक्षेत कुठेतरी त्रुटी राहिल्या, हे मान्य केले पाहिजे. यातून इस्राईलच्या मोसाद या गुप्तचर यंत्रणेचे अपयशही लख्खपणे समोर येते. इराणच्या आण्विक कार्यक्रमाला विरोध करण्याच्या नादात इस्राईलचे या आघाडीवर दुर्लक्ष, तर झाले नाही ना, असा सवालही उपस्थित होतो. काही असो. पण युद्ध आता भडकत जाण्याची शक्यताच अधिक दिसून येते. हमासच्या हल्ल्यानंतर चवताळलेल्या इस्राईलनेही तोडीस तोड उत्तर देत गाझा पट्टीवर बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. या दोहोंच्या संघर्षात लेबनानमधील दहशतवादी गट हेजबोलानेही उडी घेतल्याने या युद्धाची व्याप्ती आणखी वाढू शकते. इस्राईलव्याप्त गोलन टेकड्यासह अन्य भागात त्यांनी केलेले हल्ले हाही पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकेल. अर्थात दोन्ही आघाड्यांवर लढताना इस्राईलची कसोटी लागू शकते. या संघर्षात आत्तापर्यंत दोन्ही बाजूकडील शेकडो सैनिक, नागरिक यात मृत्यमुखी पावले असून, जखमींची संख्याही वाढत असल्याचे पहायला मिळते. गाझा पट्टीत नागरी वस्त्यांना लक्ष्य करतानाच पाणी, वीज, खाद्यपदार्थांची रसद तोडून इस्राईलने पुढचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागतील, हे वेगळे सांगायला नको. रशिया व युक्रेनमधील संघर्षाचे इंधन, खाद्यतेलापासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम झाल्याचे आपण अनुभवलेच आहे. आता पुन्हा या दुष्टचक्रातून आपल्याला जावे लागणार का, याची भीती सर्वसामान्यांच्या मनात दाटली आहे. स्वाभाविकच या युद्धाचे ढग लवकरात लवकर दूर होणे, हेच संपूर्ण जगाच्या हिताचे असेल. इस्राईल व पॅलेस्टाईन वादात जेरूसलेम हाही कळीचा मुद्दा आहे. ज्यू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून या शहराकडे पाहिले जाते. आजमितीला हे शहर वेस्ट बँकमध्ये आहे. ज्यूंना देशाअभावी जसा वणवण प्रवास करावा लागला, तीच स्थिती पॅलेस्टाईन नागरिकांचीही आहे. त्यामुळे स्वतंत्र पॅलेस्टाईनचा मुद्दा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सोडविता येईल काय, हेही पहायला हवे. अर्थात परस्परांवरील हल्ल्यातून हे प्रश्न सुटणारे नाहीत. ‘हमास’नेही हे ध्यानात घ्यावे. आजतरी सुवर्णमध्य साधण्याशिवाय पर्याय नाही.
Previous Articleस्विस बँक खात्यांचा तपशील भारताला प्राप्त
Next Article क्लॉडिया गोल्डीन यांना अर्थशास्त्रातील नोबेल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








