बालहक्क संरक्षण आयोगाने घेतलीय गंभीर दखल
मडगाव : गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलाची 40 तासानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याने खेद व्यक्त केला आहे. सर्व महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी 40 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. पोस्को कायदा, 2012 च्या प्राथमिक उद्देशांपैकी एक म्हणजे लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या मुलांना बाल-अनुकूल पद्धतीने जलद न्याय प्रदान करणे आवश्यक असते. फोंडा पोलिसात दाखल झालेल्या बाल अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देण्यात सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे.
दरम्यान, गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सर्व महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी 40 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनकडून चौकशी अहवाल मागविण्याचा निर्णय घेतला आहे. फोंडा येथे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी कोण करणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे, न्यायवैद्यक पुराव्यासाठी त्या अल्पवयीन मुलाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसमोर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर पाठविण्यात आले आणि घटनेच्या जवळपास 40 तासांनंतर तपासणी करण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलावर झालेला हा आघात असल्याचे सांगत, गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने अल्पवयीन मुलाला दिलेल्या वागणुकीची गंभीर दखल घेतली आहे आणि गोमेकॉच्या डीनकडून चौकशी अहवाल मागवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष पीटर बोर्जेस यांनी दिली आहे.
मुलाला फेंड्यातून पाठवले गोमेकॉत
बुधवार 4 ऑक्टोबरच्या रात्री फोंडा येथील एका 11 वर्षाच्या मुलावर 22 वषीय बिहारच्या रहिवाशाने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच रात्री पीडित मुलाला फोंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले, त्यावेळी एक महिला डॉक्टर ड्युटीवर उपस्थित होती. परंतु पुराव्यानिशी वैद्यकीय तपासणी करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने त्या मुलाला गोमेकॉत पाठविण्यात आले.
गोमेकॉत दुसऱ्या दिवशी बोलविले
मात्र, गोमेकॉत मेडिकल कोणी करायचे या संभ्रमात मेडिकल झाले नाही आणि पोलिसांना दुसऱ्या दिवशी पीडित मुलासोबत येण्यास सांगण्यात आले.
डीनना पत्र लिहिण्यास सांगितले
गुऊवारी, जेव्हा पोलिसांनी पीडितासोबत जीएमसीला भेट दिली तेव्हा त्यांना पीडित मुलावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी जीएमसीच्या डीनला पत्र लिहिण्यास सांगण्यात आले आणि पीडिताला पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी तीन डॉक्टरांसह एक विशेष समिती स्थापन करून शुक्रवारी सायंकाळी मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
केवळ 40 मिनिटांच्या प्रक्रियेला लागले 40 तास!
या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 40 तास लागले, जे महिलांच्या बाबतीत फक्त 40 मिनिटात वैद्यकीय तपासणी होत असते. पीडित सहाय्यता युनिटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या बाबतीत, पीडितेला ऊग्णालयात दाखल केल्यावर 40 मिनिटांच्या आत चिकित्सा केली जाते आणि अहवाल सादर केला जातो.









