मंत्री रोहन खंवटे : पर्वरीत शिवशौर्य यात्रेचे स्वागत
पर्वरी : आमच्या पुढील पिढीला शिवशौर्य यात्रेचे महत्त्व समजले पाहिजे. छत्रपती महाराजांचा गोव्यासाठी, देशासाठी वाटा आहे, त्यांचे महत्त्व कुठेच कमी पडू नये म्हणून पर्यटन खात्यातफ्xढ पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को, फोंडा आणि डिचोली या सहा ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर केले. हे करताना नव्या पिढीला या उत्सवात सामील करून घेणे हे आमचे ध्येय असेल असे मंत्री खंवटे म्हणाले. विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे पर्वरीत स्वागत करताना मंत्री रोहन खंवटे बोलत होते. व्यासपीठावर विश्वहिंदू परिषदेचे मोहन आमशेकर, बजरंग दलाचे संयोजक मनीष नाईक, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, सुकूर सरपंच सोनिया पेडणेकर, उपसरपंच दीपाली वेर्णेकर, माया केणी, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तिन्ही पंचायतीचे पंचायत सदस्य, पर्वरी युवा वेल्फेअर असोसिएशनचे सचिव सुरज बोरकर, विद्याप्रबोधिनी विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात सर्व धर्मीय लोक होते. जात, शिवरायांनी धर्म न पाहता हिंदू, मुस्लिम एकत्र आणून एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या सैन्यात सेनापतीसह लढवय्ये सैनिक मुस्लिम होते. महाराजांची कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कोणताही भेदभाव न करता महाराजांनी सर्वाना एकत्र आणले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. आजही आपण त्यांच्या शौर्याची आठवण काढतो आणि आम्हाला स्फुरण मिळते. आज विश्वहिंदू परिषदेची शिवशौर्य यात्रा पर्वरीत आली तेव्हा हेच दृश्य आम्हाला पर्वरीत पहावयास मिळाले. सर्व धर्माचे, जाती, पंथाचे लोक या यात्रेत सहभागी झाले त्याबद्दल आपण विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांचे अभिनंदन करतो, असे मंत्री खंवटे म्हणाले. यावेळी मोहन आमशेकर यांनी यात्रेचे महत्त्व आणि समग्र माहिती दिली. यावेळी विद्याप्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी क्षात्रतेज संकुलातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मंत्री रोहन खंवटे आणि इतर मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर हनुमान महाऊद्र मंदिराकडून दुचाकीची रॅली काढण्यात आली.









