छताला गळती लागल्याने भीती : दुरुस्ती करण्याची प्रशासनाकडे मागणी
बेळगाव : सरकारकडून धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून त्या पाडविण्यासाठी सर्वसामान्यांना नोटिसा दिल्या जातात. परंतु, सरकारी बांधकाम कोसळण्यास आले तरी त्याचा वापर केला जात असल्याने सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नेहरूनगर येथील हेस्कॉम ग्रामीण उपविभाग-1 कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या स्वच्छतागृहाच्या छताला गळती लागली असून ते केव्हा कोसळेल? याची शाश्वती नाही. त्यामुळे हेस्कॉम प्रशासनाने या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कार्यालयात येणारे नागरिक तसेच कर्मचाऱ्यांसाठी हेस्कॉमने स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले आहे. जुन्या स्वच्छतागृहालाच काही महिन्यांपूर्वी रंग देऊन फरशा बसविण्यात आल्या. परंतु, जुन्या छताला गळती लागलेली असल्याने छताचे प्लास्टर वरचेवर कोसळत आहे. कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घालून देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. एखाद्या वेळेस छत कोसळून गंभीर दुखापत झाल्यास हेस्कॉम त्याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुर्घटना घडण्यापूर्वी स्वच्छतागृहाची डागडुजी करा
दरवर्षी कार्यालयाच्या डागडुजीसाठी राखीव निधी असतो. केवळ रंगकामासाठी हा निधी न वापरता इमारती तसेच स्वच्छतागृहांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. हेस्कॉमच्या ग्रामीण उपविभाग-1 कार्यालयामध्ये दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी स्वच्छतागृहाची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









