केरकचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ : कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज : नदीचे सौंदर्य टिकविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक
वार्ताहर /किणये
राकसकोप परिसरातील मार्कंडेय नदीत केरकचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून या नदीमध्ये कचरा टाकण्यात येऊ लागला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कचरा टाकण्याचे प्रमाण वाढतच राहिल्यास या नदीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. याची चिंताही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीत केरकचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बेळगाव शहरवासियांची तहान भागविणाऱ्या राकसकोप धरणानजीकच्या मार्कंडेय नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. धरण भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात. परंतू त्या पुलाजवळ केरकचरा टाकण्यात येऊ लागला आहे.
या ठिकाणाहूनच मार्कंडेय नदी तालुक्याच्या पश्चिम भागातून राकसकोप, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, उचगाव, आंबेवाडीमार्गे कंग्राळी खुर्द परिसरातून वाहते.राकसकोप धारणाजवळून राकसकोप ते तुडये रस्ता आहे. दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्यानजीक मोठा पूल आहे. या पुलाजवळ नदीत दवाखान्यातील टाकाऊ केरकचरा, आजूबाजूच्या हॉटेलमधील कचरा, प्लास्टिक बाटल्या, दारूच्या खाली झालेल्या बाटल्या टाकण्यात येऊ लागल्या आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची जीवनदायीनी ठरणाऱ्या मार्कंडेय नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी माहिती या भागातील काही नागरिकांनी दिली आहे. बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदी ही एकमेव नदी आहे. या नदीच्या पाण्यावरच इथला बळीराजा अधिक प्रमाणात अवलंबून आहे. बैलूर (ता. खानापूर )येथे या नदीचा उगम झालेला आहे. येथून राकसकोप ते कंग्राळी खुर्दमार्गे नदी वाहत गेलेली आहे.
नदीच्या पाणीपातळीत कमालीची घट
सध्या गेल्या दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत कमालीची घट झालेली आहे. तरीही नदीच्या ज्या ज्या ठिकाणी पूल बांधण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी अडवून ते पाणी शिवारातील पिकांसाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या भागातील ही मुख्य नदी असून या नदीचे सौंदर्य टिकविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राकसकोप नदीत जे कोणी कचरा टाकत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून होत आहे.
दवाखान्यातील केरकचऱ्यामुळे जनावरांच्या जीवितास धोका
या भागातील शेतकऱ्यांसाठी ही एकमेव मार्कंडेय नदी आहे. धरणाजवळील पुलाजवळ केरकचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर वेळीच निर्बंध आणणे गरजेचे आहे. कारण नदीत दवाखान्यातील टाकाऊ केरकचरा टाकण्यात येऊ लागला आहे. तसेच प्लास्टिकही टाकण्यात येत आहे. या नदीतील पाणी जनावरे पितात. त्यामुळे दवाखान्यातील टाकाऊ केरकचऱ्यामुळे जनावरांच्या जीवितासही धोका निर्माण होणार आहे. ग्रामपंचायतींनी तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी आमची मागणी आहे.
– सोमनाथ सुकये, राकसकोप









