पुणेस्थित खानापूर मित्रमंडळींच्या वतीने घोषणा : आमदार विठ्ठल हलगेकर यांचा बैठकीत सत्कार
खानापूर : खानापूर तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करून उद्योगाची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा पुणेस्थित खानापूर मित्रमंडळींच्या वतीने करण्यात आली. पुणे येथील स्वर्ण हॉटेलच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील उपस्थित होते. पुणेस्थित खानापूर तालुक्यातील उद्योजकांनी खानापूर मित्रमंडळाची स्थापना केली असून या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यातीलच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यासाठी औद्योगिक हब उभारण्याचा संकल्प या मंडळाने केला असून याचा पाठपुरावा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर मित्रमंडळाचे अध्यक्ष पिटर डिसोजा होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यानंतर शिवाजी जळकेकर यांनी खानापूर तालुक्यात औद्योगिकरणात मागे पडला असल्याने युवकांनी उद्योगाकडे वळावे यासाठी या खानापूर तालुक्यात औद्योगिक हब निर्माण करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
यासाठी खानापूर मित्रमंडळाच्या वतीने गेल्या काही दिवसापासून सर्वेक्षण आणि अभ्यासदौरे सुरू आहेत. तसेच या हब उभारणीसाठी जागेची चाचणीही सुरू असून येत्या काही दिवसात खानापूर तालुक्यात निश्चित मित्रमंडळाच्या वतीने सर्वसोयीनीयुक्त असा औद्योगिक हब निर्माण करण्याची संकल्पना मूर्त स्वरूपात येईल. आणि खानापूर तालुक्यातील युवा उद्योजकांना वाव देण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या काही दिवसात खानापूर येथे बैठक घेऊन पुढील रूपरेषा आखण्याचे ठरविण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी, या स्तुत्य उपक्रमाबाबत आमदार या नात्याने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच ही औद्योगिक वसाहतीची कल्पना लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी मी शासन दरबारीही प्रयत्न करीन. तसेच याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी येत्या महिन्याभरात खानापूर येथे व्यापक बैठक घेऊन याला निश्चितच चालना देऊ, असे आश्वासन आमदार हलगेकर यांनी दिले. यावेळी केशव जावळेकर यांनी, खानापूर तालुक्यात उद्योगाला चालना मिळावी यासाठी येत्या काही दिवसात खानापूर येथे पुणेकर मित्रमंडळातर्फे उद्योजक मेळावा भरवणार असल्याचे जाहीर केले. यावेळी मित्रमंडळाचे रामचंद्र बाळेकुंद्री, परशराम नीलजकर, संचालक बाळकृष्ण पाटील, देमानी मष्णुचे, बीपीएल फाउंडेशनचे केदार शिवणगेकर, प्रशांत गुंजीकर, नामदेव पाटील, नारायण पाटील, केपीएलचे अध्यक्ष रामू गुंडप, सचिन पाटील, सातेरी पाटील, किरण पाटील, दत्ता भेकणे आदी उपस्थित होते.









