वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे झालेल्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राची महिला टेनिसपटू ऐश्वर्या जाधवने दर्जेदार कामगिरी करत मुलींच्या 18 वर्षाखालील वयोगटात एकेरीचे जेतेपद पटकावले.
दिल्ली जिल्हा टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऐश्वर्याने द्वितीय मानांकित कर्नाटकाची सुचिता मारुरीचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटातील एकेरीचे जेतेपद ऋषील खोसलाने पटकावले. अंतिम सामन्यात त्याने समर्थ सचिताचा 6-3, 6-3 असा पराभव केला. सदर स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या एकेरीतील अजिंक्यपद अनुक्रमे सिद्धार्थ विश्वकर्मा आणि रश्मिका श्रीवल्लीने पटकावले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिद्धार्थने हरियाणाच्या करणसिंगचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रश्मिकाने गुजरातच्या वैदेही चौधरीवर 6-4, 4-6, 7-6(7-5) अशी मात केली. या स्पर्धेमध्ये देशातील अव्वल टेनिसपटूंनी आपला सहभाग दर्शवला होता.









