संरक्षण संबंध मजबूत करण्याचा उद्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत ते या देशांच्या दौऱ्यावर असणार आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. स्वत:च्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते रोम येथे इटलीचे संरक्षणमंत्री गुइडो क्रिसेटो यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. मार्च महिन्यात इटलीच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक भागीदारीपर्यंत वाढविण्यात आले होते.
दुसऱ्या अन् अंतिम टप्प्यात राजनाथ सिंह हे पॅरिसमध्ये फ्रेंच सशस्त्र दल मंत्री सेबेस्टियन लेकोर्नू यांच्यासोबत 5 व्या वार्षिक संरक्षण चर्चेत सामील होतील. भारत आणि फ्रान्सने अलिकडेच रणनीतिक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आनंद व्यक्त केला होता. दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण औद्योगिक सहकार्यासोबत मजबूत अन् व्यापक संरक्षण संबंध आहेत.
इटली आणि फ्रान्समध्ये औद्योगिक सहकार्याच्या संभाव्य संधींवर चर्चा करण्यासाठी राजनाथ सिंह हे तेथील संरक्षण उद्योगांचे सीईओ तसेच वरिष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत.









