फिरहाद हकीम अन् मदन मित्रा अडचणीत
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी कोलकात्यात राज्याचे वरिष्ठ मंत्री फिरहाद हकीम आणि मदन मित्रा यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. शहरविकास अन् नगरपालिका विषयक मंत्री हकीम हे कोलकात्याचे महापौर देखील आहेत. ते तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून पक्षसंघटनेत त्यांचा मोठा प्रभाव आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांचे पथक केंद्रीय सुरक्षा दलांच्या एका तुकडीसोबत दक्षिण कोलकात्यातील हकीम यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी हकीम यांची चौकशी केली आहे. या कारवाईदरम्यान हकीम यांचे समर्थक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली आहेत.
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील कमरहाटीचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानी देखील सीबीआयने झडती घेतली आहे. हकीम आणि मित्रा या दोघांनाही नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी 2021 मध्ये सीबीआयने अटक केली होती. मित्रा यांना 2014 मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी देखील सीबीआयने अटक केली होती.
तत्पूर्वी ईडीने एका प्रकरणाच्या तपासाकरता राज्याचे अन्न अन् पुरवठा मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. 2014-18 दरम्यान राज्याच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पैसे स्वीकारून सुमारे 1500 जणांची अवैध भरती करण्यात आल्याचा आरोप आहे.









