अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, माझ्या प्राप्तीच्या उद्दिष्टाने माझी चौथी भक्ती करणाऱ्या भक्ताने सर्वांच्या ठिकाणी माझी वस्ती आहे ह्या भगवद्भावाने सर्वांना लोटांगण घालावे. कोणतेही कायिक, वैदिक, लौकिक कर्म करताना किंवा व्यापार करताना माझी आठवण ठेवावी. असे केले की, सर्व चराचरात त्याला माझ्या रूपाची जाणीव होत राहते. अशी मनाची अवस्था जोपर्यंत उद्धवा प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी माझे भजन म्हणून सर्वाभूती भगवद्भाव ठेवावा. मी सांगतोय तसा सर्वाभूती भगवद्भाव ठेवायचा सोडून कुणी इतर अनेक साधने करून माझी अनुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना त्यातून माझी कणभरसुद्धा प्रचीती येणार नाही. म्हणून हे सर्व लक्षात घेऊन सर्वाभूती भगवद्भजन करावे अशी माझी आज्ञा आहे असे समज. अशा परिस्थितीतही माझा भक्त त्याचे कर्तव्य करण्यास चुकत नाही. ते तो कुणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता पार पाडत असतो. अशा भक्ताला निश्चितच माझी प्राप्ती होते. जो काया, वाचा आणि मनाने सर्वभुते ही माझेच रूप आहेत हे लक्षात घेऊन त्यांना भजतो त्याच्या मनात ती माझी रूपे निश्चितपणे ठसतात. हे ठसणे एव्हढे जबरदस्त असते की, त्याला सर्व भूतात मीच दिसू लागतो. ह्याच्याही पुढे जाऊन त्याला समोर दिसणाऱ्या माझ्या रूपातील विविध व्यक्ती वेगवेगळ्या नजरेस न येता सर्वत्र एकच परब्रह्म भरून राहिले असल्याचा प्रत्यय येतो. असा प्रत्यय येऊ लागला की, तो स्वत:लाही विसरतो आणि त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जातो, तो स्वत:च परब्रह्म होतो हे त्याचे परब्रह्म होणे कसे असते हे सांगायचे झाले तर तुपामध्ये जी कणी असते ती दिसायला तुपापेक्षा वेगळी दिसते पण प्रत्यक्षात तीही तुपाचाच भाग असते, त्याप्रमाणे भक्त इतरांना एक व्यक्ती म्हणून वावरताना दिसत असला तरी तो प्रत्यक्षात परब्रह्माचाच भाग असतो. तो परब्रह्मात इतका मिसळून जातो की, आपण परब्रह्माचा भाग आहोत ह्याची जाणीवही त्याला रहात नाही. परब्रह्म सर्वव्यापी असल्याने त्याचे मीतूपण पूर्णपणे लयास जाते. ज्याला माझेच सगळीकडे दर्शन होत असते. त्याच्यासाठी वेद आणि शास्त्रार्थ जाणून घेण्याची आवश्यकता रहात नाही कारण वेद आणि शास्त्रार्थ ह्यांचा अभ्यास करून माझे दर्शन सगळीकडे कसे होईल हेच साधकाने समजून घ्यायचे असते पण माझ्या भक्ताला हे आधीच साध्य झालेले असल्याने वेद आणि शास्त्रs त्याच्या दृष्टीने निरुपयोगी होतात. जोपर्यंत अंधारात असलेल्या दोरीला मनुष्य साप समजत असतो तोपर्यंत तो त्या दोरीला घाबरत असतो पण जेव्हा ती केवळ आणि केवळ दोरीच आहे हे त्याच्या लक्षात आले की, त्याची सर्वच भीती संपुष्टात येते. त्याप्रमाणे भक्ताला सर्वत्र परब्रह्माची जाणीव होते त्यावेळी समोर दिसणाऱ्या संसाराचे मिथ्यत्व लक्षात येते. श्री शंकराचार्य ह्यांच्या अद्वैत वेदांताच्या मांडणीचा मूलाधार ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर?’ हाच आहे. ते म्हणतात केवळ ब्रह्म सत्य असून जग मिथ्या आहे म्हणजे ते समोर दिसत असलं तरी निरर्थक आहे. ब्रह्म हेच आत्मा किंवा जीव आहे आणि ह्यापलीकडे कशाचेही अस्तित्व नाही. भगवंत पुढे म्हणाले, भक्ताला ब्रह्म सत्य आहे हे जग मिथ्या आहे हे पचनी पडल्यावर त्याच्या दृष्टीने ते असले काय आणि नसले काय त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणून जेव्हा सर्वाभूती माझेच दर्शन होऊ लागते तेव्हा त्याला भूतांसहीत सर्व ठिकाणी परब्रह्माचेच अस्तित्व जाणवू लागते हे निश्चित जाण. समोर दिसणारा संसार खरा वाटत असला तरी निरर्थक आहे म्हणजे मिथ्या आहे हे लक्षात आले की, साधक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या लेखी लोकांच्या गुणदोषांना काहीच महत्त्व रहात नाही. त्यामुळे त्याचे त्याकडे आपोआपच दुर्लक्ष होते. त्यासाठी माझे भजन करणे हेच खरे साधन आहे.








