औषध खरेदीत कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गिरीश चोडणकर यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
गरीबांना व सामान्यांना सरकारी ऊग्णालयात स्वस्तात व चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला निर्देश दिलेले असतानाच राज्याच्या आरोग्य खात्यात औषध खरेदीत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी करून आरोग्य खात्यावर बॉम्ब टाकला आहे. इतर औषधालयात केवळ 131.50 इतक्या स्वस्तात मिळणारे ‘मोरपेनेम’ नावाचे इंजेक्शन तब्बल 4,800 रुपयांना आरोग्य खात्याने खरेदी केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
पणजी येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात काल (शनिवारी) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्य खात्यावर आरोप केले. यावेळी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जॉयल आंद्राद, सांताक्रूज गटाचे अध्यक्ष जॉन नाजारेथ व युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साईश आसोलकर यावेळी उपस्थित होते.
‘वेलनेस फॉरएव्हर मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी फार्मसीला फायदा मिळवून देण्यासाठी आरोग्य खात्याने औषध खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी शनिवारी दावा केला की ‘मोरपेनेम (1 जीएम)’ नावाचे इंजेक्शन 4800 रुपयांना खरेदी करण्यात आले होते, ज्याची सर्वात कमी किंमत रुपये 131.50 होती.
चोडणकर यांनी भाजप सरकार आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर सरकारी तिजोरीची लूट केल्याप्रकरणी टीका केली आणि या लुटीतून कॅन्सरच्या ऊग्णानाही सोडले नसून, वेलनेस फॉरएव्हर फार्मसीमधून त्यांना महागडी औषधे खरेदी करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप केला.
या लुटीबाबत काही उदाहरणे देताना चोडणकर म्हणाले की, ब्रेन स्ट्रोकच्या उपचारादरम्यान वापरले जाणारे ‘रीकॉम्बिनंट टिश्यू प्लाझमिनोजेन अॅक्टिव्हेटर’ इंजेक्शन 29 हजार रुपयांना खरेदी केले होते, परंतु प्रत्यक्षात त्याची किंमत 13 हजार रुपये आहे.
“मोरपेनेमचे इंजेक्शन रु . 4800 खरेदी केले, ज्याची सर्वात कमी बोली दर रुपये 131.50/- होती. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी एक औषध 1500 ऊपयांना मिळते, पण गोवा मेडिकल कॉलेजमधील वेलनेस फार्मसीमध्ये ते 5000 ते 6000 रुपयांपर्यंत विकले जाते. ते गोव्यातील जनतेची लूट करत आहेत,’ असे चोडणकर म्हणाले.
प्रक्रियेचे पालन न करता वेलनेसला 163 कोटींचा व्यवसाय
2018 ते 2022 पर्यंत वेलनेस फॉरएव्हरला 163 कोटी ऊपयांचा व्यवसाय दिला गेला आहे, तोही प्रक्रियेचे पालन न करता. “कॅगने या खरेदीबद्दल निदर्शनास आणले होते, जी सध्याच्या नियमांचे पालन न करता केली जाते. ‘इमर्जन्सी’ औषधे वेलनेस फॉरएव्हरकडून जादा दराने खरेदी केली जात आहेत आणि या आस्थापनाला फायदा व्हावा यासाठी निविदा प्रक्रिया थांबवली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
माझ्याकडे सर्व पुरावे, जाहीर चर्चेस तयार!
औषध खरेदीत सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी केवळ निविदा प्रक्रियेचे पालन करण्याचीही मागणी चोडणकर यांनी केली. माझ्याकडे औषध खरेदीत चाललेल्या लुटीचे पुरावे आहेत. म्हणून मी या मुद्द्यावर जाहीर चर्चेसाठी तयार आहे, असे सांगत चोडणकर यांनी आरोग्यमंत्री राणे यांना आव्हान दिले आहे. वेलनेस फॉरएव्हरला पसंती देण्यात काय स्वारस्य आहे? असा सवालही चोडणकर यांनी उपस्थित केला.









