तिसऱ्या टप्प्यात मोहीम : गर्भवती-बालकांना लस
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे सोमवार दि. 9 ते 14 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. गर्भवती महिला आणि बालकांना ही लस दिली जाणार आहे.
बालक आणि गर्भवती महिलांमध्ये आजाराचे प्रमाण कमी व्हावे आणि आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या तिसऱ्या टप्प्यात गर्भवती महिला शून्य ते 2 वर्ष वयोगटातील बालके आणि दोन ते पाच वयोगटातील बालकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लस घ्यावी, असे आवाहनही आरोग्य खात्याने केले आहे.
इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती मोहीम राबविली जात आहे. शाळास्तरावर याबाबत जागृती केली जात आहे. एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आशा कार्यकर्त्या आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
वंचित असलेल्यांना लस
तिसऱ्या टप्प्यातील इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
डॉ. एम. ओ. दंडगी-प्रभारी तालुका आरोग्याधिकारी









