40 हजाराची लाच पडली महागात, लोकायुक्त खात्याकडून अटकेची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून छापा टाकून टाळे ठोकण्यात आलेले ऑनलाईन सेंटर परत उघडण्यासाठी ऑनलाईन सेंटर चालकाकडून घेतलेले 40 हजार रुपये संबंधिताला परत करताना बेळगाव येथील बाल विकास अधिकाऱ्याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत यासंबंधी तक्रारी गेल्या होत्या. चव्हाट गल्ली येथील जनता ऑनलाईन सेंटरवर 27 जुलै 2023 रोजी छापा टाकून त्याला टाळे ठोकण्यात आले होते. हे सेंटर परत सुरू करण्यासाठी बेळगाव शहराचे बाल विकास अधिकारी लक्ष्मण परसाप्पा बजंत्री यांनी दोन टप्प्यात 40 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले होते.
ऑनलाईन सेंटरच्या चालकांनी कुलूप उघडून देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. हे 40 हजार आपल्या परिचितांच्या बँक खात्यात जमा करण्यास या अधिकाऱ्याने सांगितले होते. पैसे देऊनही ऑनलाईन सेंटर उघडले नाही. म्हणून संबंधितांनी वारंवार बाल विकास अधिकाऱ्याची भेट घेऊन आमच्याकडून पैसे घेतले आहात, आता ठोकलेले कुलूप उघडून द्या, अशी मागणी केली. तरीही त्यांचे काम झाले नाही.
शेवटी 5 ऑक्टोबर रोजी लोकायुक्त पोलीस ठाण्यात बाल विकास अधिकारी लक्ष्मण बजंत्री यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. लोकायुक्त विभागाचे पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, आर. एल. धर्मट्टी, यु. एस. आवटी, रवी मावरकर, मंजुनाथ कानपेठ, बसवराज मत्तीकोप्प, आर. बी. गोकाक, संतोष बेडग, गिरीश पाटील, एन. एम. मठद, अमोल कोरव, अनिल हंडुरी, गुडप्पा गुरव आदींनी शुक्रवारी छापा टाकून बाल विकास अधिकाऱ्याला अटक केली आहे.
पैसे घेऊनही काम झाले नाही म्हणून ऑनलाईन सेंटरच्या चालकाने वारंवार बाल विकास अधिकाऱ्याची भेट घेऊन साहेब, आमच्या कामाचे बघा, असा तगादा लावत होता. शेवटी याच मुद्द्यावर उभयतात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर ऑनलाईन सेंटर चालकाने माझे काम केला नाही तर लोकायुक्तांकडे तक्रार करू, अशी धमकी दिली. त्यामुळे घेतलेले पैसे परत देण्याची संबंधित अधिकाऱ्याने तयारी दर्शविली. यासाठी महांतेशनगर येथील आपल्या कार्यालयाला ऑनलाईन सेंटर चालकाला बोलावून घेतले. आपला वाहनचालक महांतेश मादर याला 25 हजार रुपये ऑनलाईन जमा करण्यास सांगितले. अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून वाहनचालकाने 25 हजार रुपये जमा करताच बाल विकास अधिकाऱ्याला लोकायुक्तांनी अटक केली.
अटकेची उलटी गंगा!
लोकायुक्त विभागातील अधिकारी एरव्ही सरकारी कामासाठी सर्वसामान्यांकडून लाच स्वीकारताना छापा टाकून रंगेहाथ अटक करतात. या प्रकरणात मात्र घेतलेली लाच परत करताना अधिकाऱ्याला अटक झाली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेवरून चव्हाट गल्ली येथील जनता ऑनलाईन सेंटरला टाळे ठोकण्यात आले होते. महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज, तहसीलदार सिदराय भोसगी, बाल विकास अधिकारी लक्ष्मण बजंत्री या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ऑनलाईन सेंटरला टाळे ठोकले होते. त्यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात दोघा जणांवर एफआयआरही दाखल झाला होता.









