वृत्तसंस्था/ चेन्नई
रोहित शर्माचा भारतीय संघ आज रविवारी येथे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून विश्वचषक मोहिमेला सुरूवात करेल तेव्हा एक अब्जाहून अधिक लोकांच्या अपेक्षांचा भार या संघाच्या खांद्यांवर असेल. एकीकडे भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आशियाई खेळांतील मोहीम फार सुखावह ठरलेली असून आता विश्वचषकात सहभागी झालेल्या भारतीय संघाकडूनही त्यांना उत्तुंग अपेक्षा असतील.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ चेपॉकवरील चांगल्या खेळपट्टीसाठी सज्ज झालेला आहे. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये भूतकाळात काही मोठ्या लढती झाल्या आहेत. जर भारताची फलंदाजी जागतिक दर्जाची असेल, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान माराही अव्वल दर्जाचा आहे. परंतु चेन्नईच्या उष्ण वातावरणाचा ते कसा सामना करतील, हा गंभीर प्रश्न आहे. रोहितला या स्पर्धेत तीन बाबींचा सामना करावा लागेल. फलंदाजीत त्याला पॉवरप्लेमध्ये आक्रमक मार्ग स्वीकारावा लागेल. दुसरे म्हणजे कर्णधार या नात्याने आपला तिसरा फिरकीपटू अश्विनला कधी आणायचे हे ठरवावे लागेल. तसेच कोणत्या खेळपट्टीवर सूर्यकुमार यादव हा श्रेयस अय्यरच्या तुलनेत अधिक प्रभावी पर्याय ठरू शकतो हे पाहावे लागेल.
शार्दुल ठाकूरला कधी खेळवायचे हेही रोहितला ठरवावे लागेल. कारण त्याच्याकडे बळी घेण्याचे कौशल्य आहे. आजच्या सामन्यात मिचेल स्टार्कला निर्भयपणे सामोरे जाण्याचा सल्ला त्याला इशान किशनला द्यावा लागेल. कारण आजारी असल्याने शुभमन गिल खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माने तो खेळण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळलेली नाही. ‘सगळे तंदुरुस्त आहेत. गिल 100 टक्के तंदुरुस्त नाही, पण तो आजारी आहे. त्यामुळे दुखापतीची चिंता नाही. आम्ही दररोज त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही त्याला ठीक होण्याची संधी देणार आहोत. त्यामुळे तो अद्याप बाहेर पडलेला नाही’, असे रोहितने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
रोहितला रवींद्र जडेजाच्या वेगवान चेंडूंचा वापर मार्कस स्टॉइनिसविरूद्ध करण्याचा पर्यायही आज चोखाळून पाहावा लागेल. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना अधिक लक्षवेधी असेल. कारण भक्कम फलंदाजी असलेल्या संघाविऊद्ध भारतीय डावपेचांची त्यातून चाचणी घेतली जाईल. दुसरीकडे, भारतीय फलंदाजांना कमिन्स, हेझलवूड, स्टार्क यांच्या वेगवान माऱ्यासह ग्लेन मॅक्सवेलच्या ऑफब्रेकला आणि अॅडम झाम्पाच्या फिरकीला तोंड द्यावे लागेल. चेपॉकच्या खेळपट्टीवर मधल्या षटकांमध्ये भारतीय फिरकी गोलंदाज कशी गोलंदाजी करतात आणि कशी पक्कड मिळवितात ते महत्त्वाचे ठरेल. चेपॉकवर भारताने 14 पैकी सात एकदिवसीय सामने जिंकले आहेत, तर या मैदानावर ऑस्ट्रेलियाने सहापैकी पाच एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.