मानवाधिकार कार्यकर्त्याला सुरक्षा देण्याचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्यानंतर संयुक्त राष्ट्राने राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने (युएनएचआर) सोशल मीडियावर यासंबंधी महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे. मणिपूर हिंसाचारावर बोलणारे मानवाधिकार कार्यकर्ते बबलू लिथोंगबम यांना मिळालेल्या धमक्मयांबद्दल आम्ही चिंतित आहोत, असे ‘युएन’ने म्हटले आहे. 5 ऑक्टोबर रोजी हिंसक जमावाने इंफाळ पश्चिम येथील कैथेलमांगबी येथील बबलू लिथोंगबम यांच्या घरावर हल्ला केला होता. ‘युएनएचआर’ने या घटनेमागे मीताई लिपुन्स आणि आरामबाई टेंगोल यांना जबाबदार धरले. बबलू लिथोंगबम, त्याचे कुटुंब आणि घर यांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जमावाने बबलू लिथोंगबम यांच्या घराची तोडफोड केली होती. मात्र, त्यावेळी ते घरी नव्हते. हल्ल्याच्या पाच दिवसांपूर्वी बबलू यांनी घरावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. हल्ल्यानंतर बबलू लिथोंगबम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी मणिपूर हिंसाचाराच्या सुऊवातीच्या दिवसात एका मुलाखतीत दिलेल्या वक्तव्याबद्दल मणिपूरच्या लोकांची माफी मागितली. बबलू लिथोंगबम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्यावर टीका केली आहे. मणिपूरमधील हिंसाचार संपवण्यासाठी भाजपने एन बीरेन सिंग यांच्याऐवजी दुसऱ्या भाजप नेत्याला मुख्यमंत्री बनवावे, असे ते म्हणाले होते. भाजप सरकारला कुकी समाजाशी चर्चा करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.









