रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलकडून हमासविरोधात युद्धाची घोषणा : 40 पॅलेस्टिनी ठार, अनेक जखमी
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. शनिवारी सकाळपासून गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ले करण्यास सुरुवात झाली. पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर 5 हजार रॉकेटमार्फत हल्ला करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी या संघर्षात 40 हून अधिक पॅलेस्टिनींचा बळी गेला असून साडेतीनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यानंतर आणि सीमेच्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली आहे. युद्धाची घोषणा होताच अमेरिकेपासून ते ब्रिटनपर्यंत सर्वांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. तर हमासने खासकरून दक्षिण आणि मध्य इस्रायलवर निशाणा साधला आहे. त्यांनी दक्षिण परिसरातील सैन्य पॅम्पवर हल्ला चढवला आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील तणाव आता रणांगणावर पोहोचला आहे. सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली की गाझाच्या हमास गटाने एकामागून एक 5000 रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. दरम्यान, या घटनेनंतर इस्रायलमधील नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. इस्रायलच्या भूमीत मोठ्या संख्येने दहशतवादी शिरल्याने इस्रायलकडून देखील या हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आले आहे. इस्रायलने आपल्या सैन्याला हवाई हल्ल्यापासून ते सागरी आणि जमिनीवर हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी इस्त्रायली लष्कराने अनेक पॅलेस्टिनींना लक्ष्य केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. त्याचवेळी ज्यू समुदायाच्या लोकांनी अल-अक्सामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आता हमासचा नाश करण्याची शपथ घेतली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून हमासला कडक इशारा दिला आहे. ‘आम्ही युद्धात उतरत असून ते आम्ही जिंकू’ असे नेतान्याहू म्हणाले. त्याचवेळी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही देशभरातील नागरिकांना सतर्क केले आहे. ‘पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलविऊद्ध “युद्ध” सुरू केले आहे. या गंभीर चुकीचे परिणाम हमासला नक्कीच भोगावे लागतील’, असे गॅलंट म्हणाले.
गाझा पट्टीतून हल्ल्याला सुरुवात
गाझा पट्टीतून इस्रायलच्या तीन शहरांवर हल्ला करण्यात आला आहे. पॅलेस्टाईनमधील संघटना ‘हमास’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्रायलसह अश्कोलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. हल्ल्यातील रॉकेट निवासी भागात पडल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाईम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, हा दहशतवादी हल्ला असून या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हमासचे दहशतवादी प्रथमच घुसले इस्रायलमध्ये
गाझा, पॅलेस्टाईन येथे असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हमासचे लढवय्ये इस्रायलच्या सीमेवरील कुंपण उद्ध्वस्त करून इस्रायलमध्ये कसे प्रवेश करत आहेत, हे दिसत आहे. दोन्ही देशांत संघर्ष वाढला असून यापूर्वी हे दोन्ही देश अनेकवेळा लढले. आता आपले लढवय्ये प्रथमच स्वत:चा बचाव करण्याच्या स्थितीत असल्याचे हमासने स्पष्ट केले.
आम्ही युद्धासाठी तयार : इस्रायल
हमासने केलेल्या हल्ल्यानंतर ‘आम्ही युद्धासाठी तयार आहोत’, असे इस्रायलने जाहीर केले. या हल्ल्याबाबत इस्रायल संरक्षण दलाच्या वतीने एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आज दिवसाची सुऊवात सायरनने झाली आहे. कारण गाझामधून आमच्यावर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. पण आम्ही स्वत:चे रक्षण करण्यास सक्षम आहोत, असे इस्रायलच्या संरक्षण दलाने स्पष्ट केले.
इस्रायलला आपण रोखले पाहिजे : हमास
इस्रायलवरील रॉकेट हल्ल्यानंतर हमास गटाचे वक्तव्य आले असून, त्यात त्यांनी अरब देशांना इस्रायलपासून दूर राहण्याचा इशारा दिला. ‘इस्रायल हा शांतताप्रिय देश नसल्यामुळे तो कधीही चांगला शेजारी होऊ शकत नाही. हा शत्रूंचा देश असल्याने आपण त्यांना रोखले पाहिजे,’ असे हमासचे म्हणणे आहे. हे युद्ध आक्रमणकर्त्यांविऊद्ध असल्याचे हमासचे प्रवक्ते खालेद कदोमी यांनी म्हटले आहे.
शत्रूला किंमत मोजावी लागेल : नेतान्याहू
गाझा येथून झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर ‘आम्ही युद्धासाठी तयार आहोत’, असे जाहीर केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा करत “आम्ही जिंकू.” अशी डरकाळी फोडली आहे. ‘आमच्या शत्रूंना या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. ही किंमत किती मोठी असेल याची ते कल्पनाही करू शकत नाहीत,’ असे नेतान्याहू म्हणाले.
मागील 15 वर्षांपासून संघर्ष
पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला ‘हमास’ इस्लामिक जिहादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण संघर्ष मे 2021 मध्ये झाला होता.
इस्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार!
हमासच्या विरोधात बेंजामिन नेतन्याहू यांना मिळाला शक्तिशाली देशांचा पाठिंबा
गाझा पट्टीमध्ये कार्यरत हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्रायलच्या दिशेने अनेक रॉकेट डागल्यामुळे देशभरात सायरन वाजले आणि त्यांना हवाई हल्ल्याचा इशारा दिला. दहशतवाद्यांनी रॉकेट डागल्यानंतर इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायलच्या दिशेने डागलेल्या रॉकेटचे आवाज गाझा पट्टीच्या आकाशात प्रतिध्वनीत झाले, तर इस्रायलला हवाई हल्ल्यांविरोधात इशारा देणाऱ्या सायरनचा आवाज देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी तेल अवीवमध्येही ऐकू येत होता.
दरम्यान, जगातील बलाढ्या नेत्यांनी हमासविऊद्धच्या युद्धात इस्रायलच्या बाजूने एकजूट दाखवली आहे. पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासने इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्याचा ब्रिटन नि:संदिग्धपणे निषेध करतो, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी स्पष्ट केले आहे. जेम्स क्लेव्हरली यांनी सोशल मीडियावर देशाची भूमिका मांडली आहे. हमासने इस्रायली नागरिकांवर केलेल्या भीषण हल्ल्याचा ब्रिटन स्पष्टपणे निषेध करतो. इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला ब्रिटनचा नेहमीच पाठिंबा देईल, असेही ते पुढे म्हणाले.
तसेच फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयानेही इस्रायली लोकांवर सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला आपल्याला अमान्य असून आम्ही दहशतवादाला पूर्णपणे नकार देत आहोत आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो, असे फ्रान्सने स्पष्ट केले आहे.
जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेरबॉक यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘निष्पाप लोकांवरील हिंसाचार त्वरित थांबला पाहिजे. गाझामधून इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा जर्मनी तीव्र निषेध करतो. निष्पाप नागरिकांवरील हिंसाचार आणि रॉकेट हल्ले आता थांबले पाहिजे. आम्ही इस्रायलच्या मदतीसाठी पूर्ण एकजुटीने उभे आहोत आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार दहशतवादाविऊद्ध स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार त्यांना आहे,’ असे अॅनालेना बेरबॉक म्हणाल्या.









