संभ्रम कायम, शोधमोहीम गतिमान, नागरिकांत भीती
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम मैदानात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे उमटू लागले आहेत. दरम्यान, वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली आहे. मात्र, अद्याप याठिकाणी कोणत्या प्राण्याचा वावर आहे, हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे वावरणारा प्राणी बिबट्या की तरस, याबाबत संभ्रम कायम आहे. पायाच्या ठशांवरून हा प्राणी तरस असावा, असा अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून परिसरात हिंस्र प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून येत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पायाच्या ठशांवरून कोणता प्राणी आहे? याचा शोध घेण्यासाठी आता टॅप कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी येथील कुत्री गायब होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वावरणारा प्राणी बिबट्याच असल्याचेही बोलले जात आहे. अलीकडे शहरात वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. गतवर्षी रेसकोर्स परिसरात तब्बल महिनाभर बिबट्याने तळ ठोकला होता. बिबट्याचा शोध घेण्यासाठी टॅप कॅमेरे, हत्ती, श्वान आणि वन कर्मचारी तळ ठोकून होते. अखेर बिबट्या वन खात्याच्या तावडीतून सहीसलामत निसटून गेला होता.
मागील महिनाभरापूर्वी शास्त्राrनगर आणि शिवाजीनगर परिसरात कोल्हे आढळून आले होते. दरम्यान, वनखात्याने शिताफीने या कोल्ह्याला जेरबंद केले होते. मात्र, आता पुन्हा बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले आहेत. भरवस्तीत या अज्ञात प्राण्याच्या पायांचे ठसे दिसून आल्याने खळबळ माजली आहे. वनखात्याने पायांच्या ठशांची पाहणी केली आहे. मात्र, अद्याप कोणता प्राणी आहे, हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे.

अनगोळ परिसरात आढळून आलेल्या अज्ञात वन्यप्राण्याचा शोध घेण्यासाठी भीमगड अभियारण्यातून कॅमेरे मागवण्यात आले आहेत. ट्रॅप कॅमेरे परिसरात बसवून नेमका कोणता प्राणी आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. त्याबरोबर इतर हालचालींवरही नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान, संबंधित प्राण्याची विष्ठा आणि इतर काही सापडते का? याचाही शोध घेतला जात आहे.
अनगोळ परिसरात ज्या ठिकाणी अज्ञात वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसून येत आहेत त्या ठिकाणी नवखाते आणि फेसबुक फ्रेंडस् सर्कलतर्फे शनिवारी ड्रोनव्दारे पाहणी करण्यात आली. दाट झाडी असलेल्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी लपला आहे का? याचा शोध घेण्यात आला. मात्र ड्रोनमध्ये देखील काहीच दिसून आले नाही.
वन खात्याने गांभीर्याने घेणे गरजेचे
मागील चार दिवसांपासून बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे दिसत असले तरी वन खाते याकडे तितक्या गांभीर्याने बघत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच वनखात्याने शोध मोहीम अधिक तीव्र करुन संबंधित अज्ञात वन्य प्राण्याचा शोध लावावा, अशी मागणी होत आहे.
पुरुषोत्तम रावजी (आरएफओ)
अनगोळ परिसरात फिरणाऱ्या वन्यप्राण्याचा शोध घेण्यासाठी भीमगड येथील ट्रॅप कॅमेरे मागविण्यात आले आहेत. परिसरातील झाडांवर हे कॅमेरे लावले जाणार आहेत. रात्रीच्या वेळेत फिरणारा हा प्राणी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.









