जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखान्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरनंतरच गाळप हंगामाला सुरुवात करावी, राज्य सरकारच्या या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व 27 साखर कारखान्यांनी पालन करणे सक्तीचे आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
2023-24 सालासाठी गाळप हंगाम सुरू करण्यासंदर्भात येथील एस. निजलिंगाप्पा साखर संस्थेच्या सभागृहात शनिवारी कारखाना मालक, व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी 1 नोव्हेंबरनंतरच हंगामाला सुरुवात करण्याची सूचना केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला दिल्या जाणाऱ्या एफआरपी दरासंदर्भात माहिती द्यावी. कारखान्याच्या नोटीस बोर्डवर यासंबंधी नोटीस लावण्यात यावी. वजन काट्यावर पारदर्शक व्यवस्था असावी. साखर उतारा दर्शविणारी मशीन लावून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना मालकांना दिली आहे.
साखर कारखान्यांना अचानक भेटी देऊन पाहणी करण्यासाठी जिल्हा पातळीवर पथकांची स्थापना करण्याबरोबरच वजन मापन यंत्र व साखर उताऱ्यासंबंधी पाहणी करण्यात येणार आहे. शेतकरी नेत्यांशी चर्चा करून ऊसदर घोषित करावा. एफआरपीप्रमाणे वेळेत शेतकऱ्यांना बिले द्यावीत. साखर नियंत्रकांच्या आदेशांचे सक्तीने पालन करण्याची सूचनाही करण्यात आली.
यंदा पावसाअभावी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अतिरिक्त दर निश्चित करावा, असे आवाहन शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, अन्न व नागरीपुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह सहकार, वजन मापन, जिल्हा पर्यावरण खात्याचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.









