जीतचे स्वार्थी हेतुचे सल्ले खपवून घेणार नाही : पेडणे जमीन ‘झोनिंग प्लान’ रद्द होणार नाही,विश्वजितनी जीतचा घेतला खरपूस समाचार
पणजी : मनात स्वार्थी हेतू ठेऊन कोणताही आमदार किंवा अन्य कोणतीही व्यक्ती सरकारला सल्ले, सूचना देऊ शकत नाही, असे प्रकार खपवून घेण्यात येणार नाहीत, असा स्पष्ट इशारा नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे. पेडणेच्या जमिनीचा विभागीय आराखडा (झोनिंग प्लान) कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांची उपस्थिती होती.
आपण दलाल, ब्रोकर नव्हे
आमदार जीत आरोलकर लोकांची दिशाभूल करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच हाच आमदार आपल्या घरी येऊन 1 लाख चौ. मी. जमीन ऊपांतरीत करून देण्याची विनवणी करत होता. त्यात ऊपांतरीत होणे केवळ अशक्य आहेत, अशा कित्येक जमिनींचा समावेश होता. आपण त्याला स्पष्ट नकार दिला. आपण एक वरिष्ठ मंत्री आहे. एजन्सी, दलाल किंवा ब्रोकर नव्हे.
घोटाळ्यात अडकलेला आमदार
कालपरवा राजकारणात आलेल्या व केवळ 200 मतांच्या आघाडीने विजयी झालेल्या जीत सारख्या एकेकाळी स्वत: ब्रोकर असलेल्या व सध्या एका जमीन घोटाळ्यामुळे एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीने आपणाला राजकारण शिकवू नये, अशा संतप्त सुरात राणे यांनी जीत यांचा समाचार घेतला.
जीतचा बेकायदा फार्महाऊसला पाठिंबा
यावेळी राणे यांनी काही फाईल्स पत्रकारांसमोर ठेवल्या. त्यात आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यातूनच एका शेतजमिनीत बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या फार्म हाऊसच्या फोटोचाही समावेश होता. हे फार्म हाऊस पाडण्यासंबंधी लवकरच टीसीपीतर्फे नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.
जीतना विधानसभेत उघडे पाडणार
असे स्वार्थी लोकप्रतिनिधी स्वत:च्या जनतेचे हीत कसे काय सांभाळणार, असा सवाल करून येत्या विधानसभेत आपण त्यांना उघडे पाडणार आहे. सरकारला पाठिंबा दिलेला आमदार असला तरीही त्याची तमा बाळगणार नाही, कारण कुणाशी कसे बोलावे याचे भान नसलेली ही व्यक्ती जनहितापेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देणारी आहे, असे सांगत राणे अक्षरश: कडाडले. जीत आरोलकर हे लोकांची दिशाभूल करून व भडकावून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहे, परंतु लवकरच आपण स्वत: मांद्रेत बैठक घेऊन सत्यस्थिती लोकांसमोर मांडणार आहे, असे राणे म्हणाले. आपण सध्या 50 दिवसांसाठी इंदोरला जाणार आहे. त्या दरम्यान प्रत्येक पंच, सरपंच, ग्रामस्थ यांनी सूचना-हरकती सादर कराव्या. खात्याची संपूर्ण टीम आणि सल्लागार मंडळ यांच्याकडून त्यांची छाननी, अभ्यास करण्यात येईल. त्यानुसार नंतर स्थानिक आमदारांसह इतरांनाही विश्वासात घेऊन लोकहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात येईल. हा आराखडा जनतेसाठीही खुला करण्यात येईल, शेवटी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून त्याला अंतिम मंजुरी देण्यात येईल. असा हा आराखडा मंजुर झाल्यानंतर त्यात ‘स्वत:चा सहभाग आहे’, असे प्रत्येक पंचसदस्यास दिसले पाहिजे याची खबरदारी घेण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले.
या आराखड्यासंबंधी यापूर्वीही आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सखोल माहिती दिली आहे. बाकी मंत्र्यांप्रमाणे मी काही येथे ‘बूर्ज खलिफा’ किंवा ‘आयफेल टॉवर’ बांधण्यासाठी आलेलो नाही. आपण लोकहितासाठी काम करणारा मंत्री आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडण्याचे प्रयत्न आपण करत आहे. मुख्यमंत्र्यांचाही आपणावर पूर्ण विश्वास आहे, असे राणे म्हणाले. जीत आरोलकर मोपा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यासाठी त्यांनी काम केले पाहिजे, त्यांनी तेथे विकास केला नसेल तर पेडणेत पारदर्शकता कशी येईल. मात्र ते काहीच न करता प्रत्येक गोष्टीस विरोध करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे. लोकशाहित एखाद्या गोष्टीस विरोध करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, परंतु तो विरोध स्वार्थासाठी असू नये, असा सल्ला राणे यांनी दिला. नियोजन हे एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हितासाठी असावे, असेही राणे म्हणाले.
पेडणेतील सर्व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा
दरम्यान, तत्पूर्वी राणे यांनी पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांच्या समवेत नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच सर्व सरपंच, पंचसदस्य यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. त्या सर्वांनी या विभागीय आराखड्याचे स्वागत केले. सर्वांच्या सहकार्यानेच तो पुढे नेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी आपणाला दिल्याचे आर्लेकर यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी बोलताना राणे यांनी सांगितले की आर्लेकर यांनी सर्व सरपंच व पंचसदस्यांसह आपल्या भूमिकेस पाठिंबा आणि सहकार्य दिले आहे. त्यांची सर्वांची मते आम्ही जाणून घेणार आहेत, असे राणे यांनी स्पष्ट केले.









