जिल्ह्यात 2 लाख 78 हजार हेक्टरमध्ये पीकहानी : 332 कोटीचे नुकसान
बेळगाव : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण खात्याचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यातील 2 लाख 78 हजार हेक्टर जमिनीतील पीकहानी झाल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. शुक्रवारी सरकारी विश्रामधाम येथे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी बैलहोंगल तालुक्यातील नेसरगीजवळील नागाप्पा हबी यांच्या जमिनीतील सोयाबीन व राजू होंगल, बसाप्पा कुंटीगेरी यांच्या जमिनीतील गाजर पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. एकरी 52 हजार रुपयेप्रमाणे 2 एकरात 1 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. बियाणे व खतांसाठी एकरी 25 हजार रुपये खर्च आला आहे, अशी माहिती बसाप्पा कुंटीगेरी यांनी अधिकाऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
नेसरगी भागात 295 हेक्टर गाजर लागवड करण्यात आली आहे. पावसाअभावी पीकहानी झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने 5 ते 6 एकर गाजर लागवड केली असून पीकहानीमुळे आम्ही सगळेच अडचणीत आलो आहोत, असे सांगत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पीकहानीसंबंधी माहिती घेतली. त्यानंतर मेराप्पा हुक्केरी यांच्या शेतजमिनीतील सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांनी 12 एकर जमिनीत सोयाबीनची पेरणी केली आहे. पावसाअभावी पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. अलीकडे पावसाचा थोडा शिडकावा झाल्यामुळे पीक हिरवे दिसत असले तरी उत्पादन मात्र मिळणार नाही, असे कमलव्वा नडहट्टी या शेतकरी महिलेने सांगितले. चचडी येथील वीरभद्रप्पा होसमनी यांच्या दीड एकर जमिनीतील सूर्यफुलाची पाहणी करण्यात आली. आतापर्यंत 20 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. परतावा मात्र काहीच मिळणार नाही, असे शेतकऱ्याने सांगितले. केंद्रीय पथकाचे प्रमुख अजितकुमार साहू यांनी पेरणी, बियाणे, खत, कामगारांची मजुरी, शेतीसाठी आलेला खर्च आदींविषयी शेतकऱ्यांकडून थेट माहिती घेतली.
जिल्ह्यात पावसाअभावी 2 लाख 78 हेक्टर पिकाची हानी झाली आहे. कृषी व बागायत पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफ मार्गसूचीनुसार 332 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला माहिती पाठविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले. सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, गाजर, मका, ऊस, टोमॅटो, वाटाणासह विविध पिकांची हानी झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पथकात तेलबियाणे विकास संचालनालयाचे संचालक डॉ. पोन्नुस्वामी, केंद्रीय आर्थिक विभागाचे साहाय्यक संचालक महेंद्र चंडेलिया, नीती आयोगाचे अधिकारी शिवशरण मीना, कर्नाटकचे कृषी आयुक्त वाय. एस. पाटील आदींचा समावेश होता. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, कृषी खात्याचे डॉ. व्ही. जे. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार व्हनकेरी, प्रांताधिकारी श्रवण नायक, बेळगाव जिल्ह्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, उपसंचालक डॉ. एच. डी. कोळेकर, बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर आदी यावेळी उपस्थित होते.
नुकसानीची छायाचित्रांसह माहिती
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्रीय पथकाला सरकारी विश्रामधाम येथे नुकसानीच्या छायाचित्रांसह माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांत जून महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे वेळेत पेरणी झाली नाही. शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे पेरणी सुरू झाली. सरकारने बेळगाव व खानापूर वगळून तेरा तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. ऑगस्टमध्येही पाऊस झाला नाही म्हणून सरकारने दुष्काळ घोषित केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.









