दिल्ली प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा
बेळगाव : बेळगावमधून देशाच्या राजधानीला गुरुवारपासून थेट विमानफेरी सुरू झाली. अभिमानास्पद बाब म्हणजे या विमानाचे सारथ्य करणारे पायलट व कर्मचारी हे बेळगावचे होते. त्यांनी स्थानिक भाषेत प्रवाशांशी संवाद साधून दिल्ली प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मागील वर्षभरापासून बंद असलेली बेळगाव-दिल्ली विमानफेरी गुरुवारपासून पूर्ववत करण्यात आली. अनेक लोकप्रतिनिधी तसेच उद्योजक-व्यापाऱ्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दिल्लीहून बेळगावला 116 प्रवासी दाखल झाले तर 136 प्रवासी बेळगावहून दिल्लीला गेले. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला.
बेळगावच्या प्रवाशांकडून कौतुक
या प्रवासादरम्यान कॅप्टनपदाची जबाबदारी सागर पाटील यांनी बजावली तर फर्स्ट ऑफिसर म्हणून अक्षय पाटील यांनी काम पाहिले. हे दोघेही बेळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्याच विमानफेरीला बेळगावचे पायलट असल्याने बेळगावच्या प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.









