वाढीव वेतन देण्याची मागणी : 31 ऑक्टोबरला बेंगळूर येथे राज्यस्तरीय आंदोलन छेडण्याचा इशारा
बेळगाव : मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या जेवणासोबतच इतर कामांना जुंपले जात आहे. निवडणुकीच्या काळात जेवण देणे याबरोबरच शाळेची स्वच्छता करणे अशी कामे दिली जात आहेत. मागील राज्य सरकारने मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांच्या वेतनात हजार रुपयांची वाढ केली. परंतु, अद्याप कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे वाढीव वेतन त्वरित लागू करावे, या मागणीसाठी मध्यान्ह आहार कर्मचारी संघाने सीटूच्या माध्यमातून शुक्रवारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा, या उद्देशाने मध्यान्ह आहार योजना सुरू करण्यात आली. यासाठी कर्मचारी भरती करून घेण्यात आली. शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांना ताजे व सकस जेवण महिला कर्मचारी करून देतात. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. रोज चार तासांचा कामाचा कालावधी असताना शाळेमध्ये मात्र सहा तास काम करून घेतले जात आहे. त्यामानाने वेतन देण्यात येत नसल्याने कर्मचारी वैतागले आहेत.
वाढीव मानधन नाही, कोणत्याही सुविधा नाहीत
मागील राज्य सरकारने मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली होती. परंतु, या सरकारने अद्याप वाढीव मानधन दिलेले नाही. याबरोबरच पगारवाढीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कर्मचारी निवृत्तीच्या टप्प्यात आले तरी अद्याप त्यांना कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचारी संघातर्फे आंदोलन करण्यात आले. याबरोबरच 31 ऑक्टोबर रोजी बेंगळूर येथे राज्यस्तरीय आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे जे. एम. जैनेखान, एल. एस. नाईक, नागाप्पा, मंदा नेवगी, सुजाता बडीगेर, पार्वती नाईक, मीनाक्षी दपडे यासह इतर उपस्थित होते.









