सार्वजनिक बांधकाम खाते-संबंधित ग्रामपंचायतांनी व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील अर्गन तलाव (गणेश मंदिर) ते बाची-शिनोळी या गावापर्यंतच्या 11 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांनी शेड, टपऱ्या उभारल्या असून याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. तातडीने सार्वजनिक बांधकाम खाते तसेच हिंडलगा, सुळगा, उचगाव, तुरमुरी ग्रामपंचायतांनी यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे. बाची ते रायचूर हा असा महामार्ग आहे. पण रायचूर ते बेळगाव या रस्त्याचे रुंदीकरण व दुपदरीकरण करण्यात आले. मात्र बेळगाव ते बाची रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.
सदर रस्त्याचेही तातडीने दुपदरीकरण करणे गरजेचे आहे. कारण बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर सातत्याने प्रवाशांची रहदारी असते. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशी तीन राज्ये जोडणारा हा मार्ग आहे. यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. अर्गन तलाव गणेश मंदिर ते बाची-शिनोळी या 11 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यवसायासाठी टपऱ्या, शेड उभारले आहेत. या सर्व टपऱ्या व दुकाने अनधिकृत असल्याचे समजते.टपरीवाल्यांनी कोणत्याही ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी न घेताच हे व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा हे व्यवसाय थाटल्याने सातत्याने या मार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून येते. तसेच फलकही रस्त्याला लागूनच उभारले आहेत.या मार्गावर अनेक गावांच्या बसस्थानकांवर बसेस, टेम्पो व इतर वाहने थांबल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा जागाच नसल्याने सदर वाहने रस्त्यावर थांबवतात. परिणामी दोन्ही बाजूला वाहनांची नेहमीच कोंडी झाल्याचे चित्र दिसून येते. यासाठी या रस्त्याचे दुपदरीकरण करणे तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांचे फलक त्वरित हटविण्याची मागणी होत आहे.
उचगाव फाट्यावर दुकान थाटणाऱ्यांना ग्रामपंचायतीने थांबविले
उचगाव फाटा हा बेळगाव तसेच कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीकडे जाणारा आणि कोवाड-नेसरी-गडहिंग्लज या भागाकडे जाणारा महत्त्वाचा फाटा आहे. या फाट्यावरती सातत्याने प्रवाशांची रहदारी असते. याच फाट्याच्या एका बाजूला माती टाकून दुकान थाटण्याचा काही जणांनी प्रकार चालवल्याचे ग्रामपंचायतच्या लक्षात येताच गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, गजानन नाईक, हनुमंत बुवा यांनी तातडीने कारवाई करून सदर काम थांबविण्यात आल्याचे दिसून आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.









