सामनावीर शकील,रिझवानची अर्धशतके, रौफचे 3 बळी, डी लीडेची अष्टपैलू चमक वाया
वृत्तसंस्था/ हैदराबाद
मोहम्मद रिझवान व सामनावीर सौद शकील यांची अर्धशतके, मोहम्मद नवाझ व शादाब खान यांचे उपयुक्त योगदान आणि हॅरिस रौफ व हसन अली यांच्या भेदक माऱ्यामुळे पाकने विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात करताना कडवा प्रतिकार करणाऱ्या नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव केला.
नेदरलँड्सकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर पाकचा डाव नेदरलँड्सच्या डी लीडेच्या भेदक माऱ्यासमोर 49 षटकांत 286 धावांत आटोपला. त्यानंतर नेदरलँड्सचे कडवा प्रतिकार करीत पाकच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण अननुभवामुळे त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले आणि 41 षटकांत त्यांचा डाव 205 धावांत आटोपला.
पाकच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. फखर झमान, इमाम उल हक, कर्णधार बाबर आझम स्वस्तात बाद झाल्याने त्यांची स्थिती 3 बाद 38 अशी झाली होती. रिझवान व सौद शकील यांनी शानदार अर्धशतके नोंदवत पाकचा डाव सावरला. रिझवानने 75 चेंडूत 68 तर शकीलने 52 चेंडूत 68 धावा फटकावल्या. या दोघांनी 120 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर बास डी लीडेने त्यांची स्थिती 6 बाद 188 अशी केली. मोहम्मद नवाझ व शादाब खान यांनी 64 धावांची भागीदारी करीत संघाला अडीचशेची मजल मारून दिली. अॅकरमनने रौफला बाद करीत पाकचा डाव संपुष्टात आणले. डी लीडेने 62 धावांत 4 बळी मिळविले.
डी लीडेने नंतर फलंदाजीतही चमकदार प्रदर्शन करीत शानदार अर्धशतक (68 चेंडूत 67) नोंदवले. याशिवाय सलामीवीर विक्रमजित सिंगनेही 67 चेंडूत 52 धावा जमविल्या. लोगन व्हान बीकने 28 चेंडूत 28 धावा केल्या. विक्रमजित व डी लीडे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भर घातली. विक्रमजित बाद झाल्यानंतर इतरांकडून फारशी साथ मिळाली नाही. हॅरिस रौफने 43 धावांत 3, हसन अलीने 33 धावांत 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : पाक 49 षटकांत सर्व बाद 286 : रिझवान 68, शकील 52 चेंडूत 68, नवाझ 39, शादाब खान 32, रौफ 16, बास डी लीडे 4-62, अॅकरमन 2-39, व्हान बीक 1-30. नेदरलँड्स 41 षटकांत सर्व बाद 205 : विक्रमजित सिंग 52, बास डी लीडे 67, व्हान बीक 28, अॅकरमन 17, रौफ 3-43, हसन अली 2-33, इफ्तिखार अहमद 1-16, नवाझ 1-31, शादाब खान 1-45, शाहीन आफ्रिदी 1-37.









