9 ऑक्टोबरऐवजी 3 नोव्हेंबर पुढील तारीख
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी आता आणखी लांबली आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर होत असलेली ही सुनावणी आता 3 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ती 9 ऑक्टोबरला होणार होती. तथापि, ती लांबणीवर पडली.
गेल्या साधारण 1 महिन्यात ही सुनावणी चारवेळा पुढे गेली आहे. मागच्या वेळच्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काही सूचना केल्या होत्या. तसेच हे प्रकरण अनिश्चित काळापर्यंत लांबविता येणार नाही. त्याची लवकरात लवकर तड लागली पाहिजे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक घोषित केले होते. या वेळापत्रकाच्या आधारे ही सुनावणी त्यांच्यासमोर 13 ऑक्टोबरला होणार आहे. ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार नार्वेकर हेतुपुरस्सर वेळ लावत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मागच्या वेळी केली होती.
11 मे ला झाला होता निर्णय
ठाकरे गटाने आणि शिवसेनेने सादर केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 11 मे या दिवशी निर्णय झाला होता. न्यायालयाने हे प्रकरण सोडविण्याचा पहिला अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे, असे स्पष्ट करत प्रकरण त्यांच्याकडे सोपविले होते. तसेच योग्य वेळेत (रिझनेबल टाईम) निर्णय करण्याची सूचना केली होती. तेव्हापासून राहुल नार्वेकर कारवाई करीत आहेत.
किती कालावधी लागणार?
नार्वेकर यांनी घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार कागदपत्रांचे संकलन, त्याची पडताळणी, तपासणी, साक्षी पुराव्यांची नोंद, साक्षीदार आणि याचिकाकर्त्यांची उलट तपासणी इत्यादी मुद्द्यांचा या प्रक्रियेत समावेश असल्याचे दिसून येते. ही प्रक्रिया लवकर संपणारी नसल्याने 2023 मध्ये या प्रकरणाचा विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय येण्याची शक्यता दुरापास्त आहे, असे तज्ञांचे मत आहे.









