100 जणांचा मृत्यू : 240 हून अधिक जखमी : दीक्षांत सोहळ्यादरम्यान बॉम्बवर्षाव
वृत्तसंस्था/ होम्स
सीरियाच्या होम्स शहरातील मिलिट्री अकॅडमीवर गुरुवारी (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 100 कॅडेट्सचा मृत्यू झाला आहे. तर 240 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 मुले आणि 6 महिलांसमवेत 14 नागरिकही सामील आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो असे सैन्याकडून सांगण्यात आले आहे.

मिलिट्री अकॅडमीत ग्रॅज्युएल सेरेमनी सुरू असताना स्फोट झाला. बॉम्ब नेमका आला कुठून हे समजण्यापूर्वीच चहुबाजूला मृतदेहांचा खच दिसून येत होता असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. या हल्ल्यातून सीरियाचे संरक्षणमंत्री अली महमूद अब्बास हे सुदैवाने वाचले आहेत. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच ते कार्यक्रमात सहभागी होत बाहेर पडले होते. अब्बास तेथून बाहेर पडल्यावर ड्रोनद्वारे तेथे बॉम्बवर्षाव आणि गोळीबार सुरू झाला होता.
सीरियाच्या सैन्याने या हल्ल्यासाठी विरोधकांना जबाबदार ठरविले आहे. परंतु या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याच संघटनेने स्वीकारलेली नाही. गृहयुद्धाला सामोरे जात असलेल्या सीरियात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला ठरला आहे. सीरियाच्या सरकारने या हल्ल्याला पूर्ण शक्तिनिशी प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली आहे. सीरियाच्या सैन्याने प्रत्युत्तरादाखल विरोधकांच्या ताब्यात असलेल्या इदलिब भागावर बॉम्बवर्षाव केला आहे.
2011 पासून संघर्ष
सीरियातील गृहयुद्ध 2011 मध्ये सुरू झाले होते. तेव्हा अध्यक्ष बशर अल-असाद विरोधात निदर्शने सुरू झाली होती, जी गृहयुद्धात रुपांतरित झाली होती. या गृहयुद्धात आतापर्यंत हजारो लोकांनी जीव गमावला आहे. तर लाखो लोकांना देशातून पलायन करावे लागले आहे.









