अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या आठवड्यात नव्या खटल्यास सामोरे गेले. नवा अशासाठी की यापूर्वी त्यांना गोपनीय कागदपत्रे स्वत:कडे ठेवणे, अश्लील अभिनेत्रीस सरकारी माध्यमातून पैसे देणे, निवडणूक निकालाविरोधात बंड करणे इत्यादी गुन्ह्यांसाठी अमेरिकेतील विविध न्यायालयात लढावे लागते आहे. अमेरिकेत घटनात्मक तरतूद अशी आहे की, एखादी व्यक्ती अध्यक्षपदावर असताना तिच्यावर न्यायालयात खटला दाखल होऊ शकत नाही.
तथापि संसदेत अविश्वासाचा ठराव आणून महाभियोगाद्वारे त्या व्यक्तिस पदभ्रष्ट करता येते. ट्रम्प हे महाभियोगाच्या कारवाईत केवळ बहुमताच्या आधाराने निसटले. त्यावेळी आपण निवडणुकीत पराभूत झालो तर आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी आपले सर्व सामर्थ्य पणास लावले आणि पराभूत झाल्यानंतर लोकशाहीयुक्त अध्यक्षास अशोभनीय आकांडतांडव केले. परंतु ‘करावे तसे भरावे’ या न्यायाने आपल्या कुकर्मांची फळे त्यांना भोगावी लागतील अशी चिन्हे आता दिसतआहेत.
ट्रम्प यांच्यावर जे खटले सुरु आहेत त्यात त्यांना सजा झाली तर अब्जावधी रुपयांचा दंड आणि 135 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल असे कायदेतज्ञांचे मत आहे. एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राजकीय इतिहासात न भुतो न भविष्यती अशा प्रकारचे अध्यक्ष होऊन गेले अशी नोंद निश्चित होईल असे त्यांचे कारनामे आहेत. इतके सारे घडूनही 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाकडून इच्छूक आहेत. पक्षाचा आपणास मोठा पाठिंबा आहे असा त्यांचा दावा आहे. मात्र अमेरिकन घटना कलम तीन आणि चौदाव्या घटना दुरुस्तीचा अंमल झाल्यास केवळ दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे ते उमेदवारीसाठी अपात्र ठरू शकतात.
न्यूयॉर्कच्या न्यायालयात कर्ज मिळवण्यासाठी आपल्या मालमत्तेचे मूल्य अवाजवी पद्धतीने वाढवून बँकाची फसवणूक करणे हा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला होता. दिवाणी न्यायालयात या संदर्भातील खटल्याची सुनावणी सुरू झाली. ट्रम्प टॉवर, मॅर-अ-लॅगो इस्टेट, याशिवाय विविध ऑफिस टॉवर्स, पेंट हाऊसेस, गोल्फ क्लब्स यांचा या मालमत्ता घोटाळ्यात अंर्तभाव आहे. गेल्या अनेक दशकांपासून ट्रम्प हे रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट म्हणून ते ओळखले जातात. याच प्रतिमेच्या जोरावर ते सत्तेपर्यंत पोहचले होते. या खटल्यात सरकारी वकील लेटिटा जेम्स यांनी आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडताना ट्रम्पनी आपल्या मालमत्तेची किंमत प्रत्यक्षापेक्षा तब्बल दोन अब्ज डॉलर्सनी फुगवून बँकांकडून अनेक आर्थिक करार आपल्या बाजुने करून घेतले. वर्षामागून वर्षे ते अशा प्रकारची फसवणूक करीत राहिले.
दूरदर्शन दर्शकांपुढे किंवा फोर्ब्स सारख्या मासिकातून श्रीमंत माणूस म्हणून झळकणे वेगळे आणि न्यूयॉर्कसारख्या शहरात प्रत्यक्ष व्यवसाय करताना सत्य परिस्थिती लपवणे वेगळे असे म्हणत सरकारी वकिलांनी त्यांच्या तीन वर्षांच्या संशोधनातून उपलब्ध झालेले पुरावे न्यायालयासमोर सादर केले. विम्याचे हप्ते कमी करून त्यातून लाभ मिळवण्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर करण्यात आला. अशा प्रकारे त्यांच्यावर 800 कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा आरोप केला गेला. याप्रसंगी युक्तिवाद करताना जेम्स म्हणाल्या, जेव्हा राजकीय व आर्थिक क्षेत्रात प्रभावशाली असलेले कायदा मोडतात आणि पात्रतेपेक्षा अधिक धनसंपत्ती मिळवतात तेव्हा असे लोक कामगार, लघु उद्योजक, कर भरणारे यांच्यासाठीची संसाधने व सोयीसुविधा कमी करून या वर्गास अडचणीत आणतात. अशा प्रकारची फसवणूक ही त्या व्यक्तिपुरतीच मर्यादित नसून ती सामाजिक परिणाम करणारी ठरते.
ट्रम्प यांचा बचाव करताना त्यांच्या वकिलांनी, स्थावर मालमत्तेचे स्थिर असे मूल्यांकन होत नाही. वस्तुनिष्ठ मूल्य याबाबतीत नसते. त्यात चढउतार होत असते. यासंदर्भात दिशाभूल आणि फसवणुकीचा प्रश्न उद्भवत नाही. ट्रम्प यांच्या स्थावर मालमत्ता विकासामुळे ग्राहक, भागीदार आणि इतर अनेकांना लाभ झाला आहे. सरकारी वकील जेम्स या राजकीय हेतुने प्रेरित होऊन खोटे आरोप करीत आहेत असे मत प्रदर्शन करीत ट्रम्पना निर्दोषत्व बहाल करण्याचा प्रयत्न केला.
हा खटला सुरू होण्याआधी ट्रम्प स्वत: माध्यमांना सामोरे गेले. ‘माझ्यावर लादलेले हे प्रकरण म्हणजे लबाड कटकारस्थान असून तो एक राजकीय हल्ला आहे. डेमोक्रॅट पक्ष ही स्वत:च भ्रष्ट व भयंकर संघटना आहे. हे लोक येणाऱ्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापासून मी माझे कुटुंबाचे प्रतिष्ठा रक्षण करणार आहे, असे ते म्हणाले. सुनावणी दरम्यानच्या मधल्या सुटीत त्यांनी न्यायाधीश ऑर्थर एन्गरॉन यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस म्हणत त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, असे संतप्त उद्गार काढले.
या सुनावणीनंतर न्यायाधीश एन्गरॉन यांनी अध्यक्ष ट्रम्प हे अनेक वर्षे बँकांची फसवणूक करीत आहेत हे ग्राह्या मानून या प्रकरणी ते दोषी असल्याचा निकाल दिला. सजा म्हणून ट्रम्प यांच्या काही कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात येत आहेत. ट्रम्प यांच्या कंपन्यांचे तटस्थ निरीक्षण यापुढेही जारी राहिल असे म्हणून सतत चुकीचे युक्तिवाद केले असा आरोप ठेवत ट्रम्प यांच्या पाच वकिलांना त्यांनी प्रत्येकी 7,500 डॉलर्स दंड आकारला. ट्रम्प यांच्या बाजूने या निकालावर आता अपिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा खटला पुढेही चालू राहिल.
ट्रम्प हे अमेरिकेतील मोठे उद्योजक आहेत. जगभरातील लोकशाही व्यवस्थेत उद्योजकांनी राजकारण करू नये असा नियमही नाही. परंतु सर्वसाधारण निरीक्षणातून असे दिसते की राजकीय क्षेत्र आणि उद्योजक यांचे संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक घनिष्ठ होत चालले आहेत. यात जनकल्याण साधण्याचा हेतू बऱ्याचदा कमी असतो. परंतु राजकीय हितसंबंधाचा फायदा घेत आपले उद्योग क्षेत्र वेगाने वाढविण्याचे प्रयत्न अनेक उद्योजक करतात आणि प्रसंगी ट्रम्प यांच्याप्रमाणे गैरमार्गांचाही अवलंब करतात. राजकीय पक्षांनाही निवडणूक व इतर अन्य कारणांसाठी पैसा लागतो. त्याची पूर्तता करीत ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू ‘कुपंथ’ या नीतीचा ते पुरस्कार करतात.
जोपर्यंत उद्योजकांना धार्जिणी सत्ता असते तोपर्यंत सारेच आलबेल असते. मात्र जेव्हा विरोधी पक्ष सत्तेवर येतो तेव्हा उद्योजक आणि त्यांच्याशी हितसंबंध असलेले राजकारणी दोघांनाही चौकशा, धाडी, न्यायालयीन कारवाई, सजा या विपरीत स्थितीचा सामना करावा लागतो. ट्रम्प सध्या याच स्थितीतून जात आहेत.
– अनिल आजगावकर








