विटा प्रतिनिधी
विटा नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रँड अँबेसिडर माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. वैभव पाटील आणि प्रतिभा पाटील यांचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालेला गौरव ही विटेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या सन्मानामुळे विटा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन विटा नगरपालिकेचा मुंबई येथे कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रँड अँबेसिडर माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील आणि नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन करत विटा शहराचे कौतुक केले. यापुढेही विटा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकाने अग्रेसर रहावे यासाठी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची भेट आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा अविस्मरणीय असल्याचे अॅड. वैभव पाटील यांनी सांगितले.








