वापराविना खराब होण्याच्या मार्गावर
सीपीआरकडूनही घेण्यास नकार
कोल्हापूर/विनोद सावंत
कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणि कोरोना सेंटरमध्ये हजारो रूग्णांना जीवदान देणारी व्हेंटिलेटर आता धुळखात आहेत. महापालिकेची 8 व्हेंटिलेटर वापरात नसल्याने खराब होण्याच्या मार्गावर आहेत. मनपाचे हे व्हेंटिलेटर सीपीआर हॉस्पिटलनेही घेण्यास नकार दिला आहे. या व्हेंटिलेटरचे करायचे काय’ असा पेचप्रसंग महापालिका प्रशासनासमोर आहे.
केंद्राकडून 2021 मध्ये कोरोनात महापालिकेला 11 व्हेंटिलेटर मिळाली. याद्वारे आयसोलेशनसह 11 केरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार झाले. यावेळी शासनाकडून मिळालेल्या व्हेंटिलेटरचा वापर केला. गतवर्षापासून कोरोना नियंत्रणात आल्याने व्हेंटिलेटरचा वापर बंद आहे. तसेच 11 पैकी सावित्रीबाई फुले, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये केवळ 3 व्हेंटिलेटर वापरात आहेत. उर्वरीत 8 व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत.
व्हेंटिलेटरची देखभाल हैदराबादमधील कंपनीकडे असल्याने ते खराब झाल्यानंतर टेक्निशियन दुरूस्तीसाठी वेळेवर येत नाहीत. सध्या मनपाची तीन हॉस्पिटल असून येथे व्हेंटिलेटरचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे ती वापराविना पडून आहेत. वास्तविक व्हेंटिलेटर वापरात नसेल तर ते खराब हेते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सीपीआर प्रशासनाला पत्र पाठवून व्हेंटिलेटर घेण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी आमच्याकडे 60 व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे मनपाचे व्हेंटिलेटर घेऊ शकत नाही, असे ‘सीपीआर’ने मनपाला कळवले. सध्या व्हेंटिलेटरचा एएमसी काळही (वार्षिक देखभाल दुरूस्ती) संपला आहे. त्यामुळे महापालिकेला व्हेंटिलेटर डोकेदुखीचे ठरत आहे.
खासगी रूग्णालयास देण्यास मर्यादा
महापालिका वापरात नसलेली व्हेंटिलेटर खासगी रूग्णालयास देऊ शकत नाही. मनपाने काही व्हेंटिलेटर खासगी रूग्णालयास दिल्याचा आरोप एका संघटनेने केल्यामुळे मनपा खासगी रूग्णालयाना व्हेंटिलेटर वापरण्यासाठी देऊ शकत नाही.
कोरोनामध्ये व्हेंटिलेटरमुळे अनेकांना जीवदान
महापालिकेने कोरोनामध्ये या व्हेंटिलेटरचा वापर झाला. कोरोना रूग्णांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात लाखोंचे बिल द्यावे लागत होते. मात्र, मनपाच्या कोरोना सेंटर, हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मिळाल्यामुळेच गंभीर रूग्णांवर मोफत उपचार करणे शक्य झाले. आता मात्र, या व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याने ते खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अन्यथा कोट्यावधीची व्हेंटिलेटर होणार स्क्रॅप
वापरात नसलेली 8 व्हेंटिलेटर त्वरीत वापरात येणे आवश्यक आहे. अन्यथा ते खराब होण्याची शक्यता आहे. शासनाकडून मिळालेली व्हेंटिलेटर सीपीआरने घेण्यास नकार दिला आहे. मनपाच्या हॉस्पिटलमध्ये याचा वापर होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनासह राज्य शासनाने यावर त्वरीत तोडगा काढणे आवश्यक आहे अन्यथा कोट्यावधीचे व्हेंटिलेटर स्क्रॅप होण्याचा धोका आहे.
राज्याकडून कोरोनामध्ये 11 व्हेंटिलेटर मिळाली होती. यापैकी सध्या 3 व्हेंटिलेटर वापरात आहेत. इतर वापरात नसल्याने खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे सीपीआर प्रशासनाला ती घेण्यासाठी विनंती केली होती. परंतु त्यांनी नकार दिला आहे. बंद व्हेंटिलेटर वापरात कशी राहतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका









