कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्रिपदाच्या निर्मितीच्या चर्चेचा जोर ओसरला आहे. काँग्रेस हायकमांडने या चर्चेत भाग घेतलेल्या नेत्यांना तोंड बंद ठेवण्याची सूचना दिल्यानंतर गेल्या आठवडाभरात या चर्चेला अल्पविराम मिळाला आहे. आता काँग्रेसचे नेते अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकराप्पा यांनी आपल्याच सरकारविरुद्ध केलेल्या टीकेमुळे कर्नाटकात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. काँग्रेस सरकारमध्ये लिंगायत अधिकाऱ्यांची घुसमट होते आहे. त्यांचे हाल कुत्रे खात नाही आहेत. ज्या ज्यावेळी लिंगायत मुख्यमंत्री होते, त्या त्यावेळी आपल्या अधिकाऱ्यांवर अशी वेळ आली नव्हती, असे सांगत सिद्धरामय्या सरकारमध्ये लिंगायतांना योग्य स्थान मिळत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आपल्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ अशी झाली आहे. भाजपने नेमका याच संधीचा फायदा घेत शामनूर शिवशंकरप्पा यांनी जे बोलले आहे, ते खरे आहे, अशी भूमिका मांडली आहे.
गेल्या आठवड्यात शिवशंकरप्पा यांनी केलेल्या या आरोपाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर दिले. आपल्या सरकारमध्ये कोणावरच अन्याय झालेला नाही आणि यापुढेही आपण तो होऊ देणार नाही. पाच गॅरंटी योजना जाहीर करताना कोणत्याही एका जातीसाठी आपण त्या लागू केलेल्या नाहीत. राज्यातील संपूर्ण जनतेच्या हिताचा विचार करून या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. आपल्या मंत्रिमंडळात लिंगायत समाजाचे सात मंत्री आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतरही शिवशंकरप्पा थांबायचे नाव घेत नाहीत. प्रत्येक ठिकाणी लिंगायतांना डावलले जात आहे. या निवडणुकीत 74 लिंगायत आमदार निवडून आले आहेत. आम्ही मनात आणले असते तर आमचेच सरकार स्थापन करता आले असते, असे सांगत हा वाद आणखी वाढवण्याचाच प्रयत्न त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, बसवराज बोम्माई, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिवशंकराप्पा यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत काँग्रेसमध्ये लिंगायतांना स्थान नाही, हे त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याने उघड केले आहे. त्यामुळे शिवशंकराप्पा यांच्या पाठीशी आपण आहोत, असा संदेश दिला आहे.
वीरेंद्र पाटील यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून एस. बंगारप्पा यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविल्यानंतर कर्नाटकातील लिंगायतांनी काँग्रेसकडे पाठ फिरविली होती. त्यानंतरच्या अनेक निवडणुकांत काँग्रेसला धक्के बसले. याच परिस्थितीचा फायदा घेत भाजप पुढे आला. भाजपने बी. एस. येडियुराप्पा, जगदीश शेट्टर, बसवराज बोम्माई आदी लिंगायत नेत्यांना मुख्यमंत्री केले. पक्षांतर्गत राजकारणाचा एक भाग म्हणून येडियुराप्पा यांची गच्छंती करून मुख्यमंत्रिपदावरून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या विरोधात टीका करीत येडियुराप्पा यांना सहानुभूती दर्शविली होती. भाजपला लिंगायतांची कदर नाही म्हणून येडियुराप्पा यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना सत्तेवरून बाजूला सारण्यात आले आहे, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी हा विषय निवडणूक प्रचारातही वापरला. आता तेच काम भाजप नेते करू लागले आहेत. शामनूर शिवशंकराप्पा यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरुद्ध केलेल्या टीकेमुळे भाजप नेते सुखावले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून रंगलेल्या या चर्चेमुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जाऊ नये याची काळजी घेण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. शिवशंकराप्पा यांच्या पाठोपाठ अनेक आमदारांनीही आपल्यावर अन्याय होतोय, याची री ओढली आहे. तर बसवराज रायरे•ाr यांच्यासारख्या काँग्रेसमधील लिंगायत नेत्यांनी काँग्रेसमध्ये लिंगायत समाजावर अन्याय झाला नाही, असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर विश्वास दाखविला आहे. तरीही शिवशंकराप्पा स्वस्थ बसेनात. याची कारणेही वेगळी आहेत. पुढील महिन्यात दावणगेरे येथे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याआधी राजकीय वातावरण तापवण्याचा यामागचा हेतू असावा. एखादे सरकार बदलल्यानंतर साहजिकच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मागील सरकारच्या ध्येयधोरणांनुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलून आपली ध्येयधोरणे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची वर्णी लावली जाते. सरकार कोणाचेही आले तरी ही प्रक्रिया सहजरीत्या चालत असते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या चर्चेने उचल खाल्ली आहे. त्यामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी शामनूर शिवशंकराप्पा यांनी केलेल्या टीकेचे खंडन करीत काँग्रेस सर्वांना समान वागणूक देते. त्यामुळे कोणावर अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही, असे जाहीरपणे सांगण्यात येत आहे. आजवर सिद्धरामय्या यांना पाण्यात पाहणारे विधान परिषद सदस्य एच. विश्वनाथ यांनीही सिद्धरामय्यांचे समर्थन केले आहे. सरकारमध्ये लिंगायत समाजाचे सात मंत्री आहेत. तुम्हाला आणखी काय हवे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कर्नाटकातील पराभवानंतर खचलेल्या भाजपच्या आशा अशा चर्चेमुळे पल्लवित झाल्या आहेत. गेल्या रविवारी कर्नाटकात अनेक शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक झाली. या मिरवणुकीदरम्यान शिमोग्यात जातीय संघर्ष निर्माण झाला. या संघर्षावरूनही काँग्रेस-भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यामुळे जातीय संघर्ष वाढू लागले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. शिमोग्यात दंगल झाली ती टिपू सुलतानच्या कटआऊटवरून झाल्याची माहिती आहे. कर्नाटकाच्या राजकीय प्रयोगशाळेत आता पुन्हा जातीय दंगलींचे प्रयोग सुरू झाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर राहणार नाही, असे भाकित माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे. भाजप-निजद युतीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी हे भाकित केले आहे. ही युती दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना मान्य नाही. या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर एस. टी. सोमशेखर यांच्यासह भाजपमधील काही आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस सरकारमध्ये लिंगायतांवर अन्याय होतोय, हा त्यांच्याच पक्षातील नेत्याने केलेला आरोप काँग्रेस कसा खोडून काढणार? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.








