चित्रपटासाठी आकांक्षाचे नाव चर्चेत
आशिकी 3 या चित्रपटाच्या घोषणेपासून निर्माते मुख्य नायिकेचा शोध घेत आहेत. याता या चित्रपटाकरता दाक्षिणात्य अभिनेत्री आकांक्षा शर्माची निवड करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. आकांक्षाने चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोलणी चालविली आहे. सर्वकाही सुरळीत राहिल्यास आकांक्षा ही आशिकी 3 चित्रपटात कार्तिक आर्यनची नायिका म्हणून झळकणार आहे. निर्माते या चित्रपटासाठी नवा चेहरा शोधत आहेत. आशिकी फ्रेंचाइजीमध्ये नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल याचे उत्तम उदाहरण आहे. तर आशिकी 2 या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर झळकले होते. आकांक्षा शर्मा ही मॉडेल तसेच कन्नड चित्रपटसृष्टीत कार्यरत अभिनेत्री आहे. तिने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केली होती. यानंतर तिने 2020 मध्ये प्रदर्शित त्रिविक्रम चित्रपटात काम केले होते. तसेच टायगर श्रॉफसोबत ती ‘डिस्को 82’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसून आली होती. आकांक्षाने महेश बाबू, वरुण धवन आणि कर्थी यासारख्या कलाकारांसोबत जाहिरातींमध्ये काम केले आहे. आशिकी 3 या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे.









