वृत्तसंस्था /मोगादिशू
सोमालियात दहशतवाद्यांच्या विरोधात सोमाली राष्ट्रीय सैन्याकडून कठोर कारवाई केली जात आहे. मागील दोन महिन्यांमध्ये मध्य सोमालियाच्या गाल्मुदुग आणि हिर्शबेले प्रांतात सैन्याने केलेल्या कारवाईत अल-शबाबचे 1,650 दहशतवादी मारले गेले आहेत. तर 550 हून अधिक दहशतवादी जखमी झाल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. सैनिकांनी स्थानिक सुरक्षा दल आणि आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांसोबत मिळून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहेत. सैन्याच्या कारवाईनंतर अनेक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे सोमालियाच्या सरकारकडून सांगण्यात आले. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी मागील वर्षी दहशतवादी संघटनेच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर दहशतवाद्यांच्या विरोधात आक्रमक कारवाई केली जात आहे.









