सेवानिवृत्ती निमित्त वनखात्याकडून गौरव
ओटवणे प्रतिनिधी
वनविभागाची धुरा सांभाळताना वनपाल अनिल मेस्त्री यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने वन कर्मचारी, स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकसहभागातून वनसंवर्धनासह संरक्षणासाठी राबविलेले विविध उपक्रम आदर्शवत होते. तसेच वन खात्याच्या कामाशी प्रामाणिक व इमानदारीने वागणाऱ्या अनिल मेस्त्री यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यात कसूर न करता त्यांनी शेतकर्यांशी आपुलकीने वागून त्यांच्या समस्या सोडविण्यास त्यानी नेहमी प्राधान्य दिले. असे प्रतिपादन कुडाळ तालुका वनक्षेत्रपाल संजीव कुंभार यानी केले.
वसोली वनपाल अनिल अनंत मेस्त्री हे वन खात्यातील २६ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संजीव कुंभार बोलत होते. यावेळी मठ वनत्रपाल सावळा कांबळे, माणगाव वनपाल आवडी परब, संशोधन विभागाच्या वनपाल निलम मोरये, चाफेली वनपाल तानाजी दळवी, बांदा वनपाल प्रमोद सावंत, सामाजिक वनीकरणचे सुनिल सावंत, मालवणचे वनपाल श्रीकृष्ण परीट, नेरुरचे वनपाल अनिल राठोड उपस्थित होते.
यावेळी श्रीकृष्ण परीट यांनी हत्तींच्या बंदोबस्तासह हत्ती हटाव मोहिमेत अनिल मेस्त्री यांनी महत्त्वाची भूमिका बजावताना लोकसहभागातून वन खात्याच्या योजनाही प्रभावीपणे राबवल्या असे सांगितले. तर प्रमोद मेस्त्री यांनी सावंत यांनी जंगलातील पशु पक्षांना उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाई भासू नये तसेच पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीत येऊ नये यासाठी अनिल मेस्त्री यांनी लोकसहभागातून जंगलातील झरे पुनर्जीवित केले. तसेच वन्य जीवांचे महत्व, वन्यजीव संरक्षण कायदे याबाबत ठिकठिकाणी त्यांनी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांमध्ये केलेली जनजागृती कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी सावळा कांबळे, श्री पटेकार आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना वन खात्याच्या कामाशी प्रामाणिक व इमानदारीने वागणाऱ्या वनपाल अनिल मेस्त्री यांच्या सेवेचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनिल मेस्त्री यांनी आपल्या वनखात्यातील सेवेत सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य लाभले. कुटुंबानेही चांगली साथ दिली. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण वन खात्यातील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यामुळे या सर्वांचे सहकार्य आपण कधीच विसरू शकत नसल्याचे सांगितले.यावेळी अनिल मेस्त्री यांच्या पत्नी सौ अंकिता मेस्त्री, मुलगा भूषण मेस्त्री, मुलगी रुचिरा मेस्त्री, वसोली वनरक्षक बदाम राठोड, आंजिवडे वनरक्षक स्वप्निल सव्वाशे, तुळस वनरक्षक श्री नरळे, चाफेली वनरक्षक श्री आरगडे, वाडोस वनरक्षक पटेकार आदी उपस्थित होते.









