त्रिमुर्ती कॉलनीतील प्रकार : बॅरेकेट्स नसल्याने अपघाताच्या घटना
वार्ताहर कळंबा
कळंबा ग्रामपंचायतीने त्रिमूर्ती कॉलनी येथील रोडवर गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्वमधील गळती काढण्यासाठी मोठा खड्डा खोदला आहे. खड्ड्याच्या भोवती बॅरेकेट्स लावलेले नाही. रस्त्यावर लाईटही बंद असल्याने हा खड्डा दिसून येत नाही. बुधवारी रात्री अंक विक्रेताचा मुलगा या खड्ड्यात पडून जखमी झाला. यामुळे हा खड्डा आता जीवघेणा बनला आहे.
कळंबा गावामध्ये पिण्याच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असल्याने खुदाई केली आहे. याच प्रकारे त्रिमूर्ती कॉलनी येथे रस्त्यामध्ये खड्डा खोदला आहे. येथे व्हॉल्वमध्ये बिघाड झाला असून चार दिवस झाले तरी काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे या परिसरातील लाईटचीही समस्या आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात खड्डा दिसून येत नाही. यामुळे हे खड्डा अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. बुधवारी रात्री असाच प्रकार घडला. रात्री आठच्या सुमारास शहर वृत्तपत्र विक्रेते रवी पाटील यांचा मुलगा अनुष पाटील हा क्लास अटपून सायकलने घरी परत येत होता. त्रिमुर्ती कॉलनी येथे आला असता लाईट नासल्याने त्याला अंदाज आला नसल्याने खड्ड्यात कोसळला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखपत झाली असून हात आणि डोक्यालाही लागले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनुष हा काळंबा येथील राम गल्लीतील सर्वसामान्य कुटुंबातील शाळकरी मुलगा असून सध्या नववीत आहे. खड्यात पडून जखमी झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. नाकाचे हाडही तुटले आहे. यामुळे त्याला काही दिवस शाळेलाही जात येणार नाही. ग्रामपंचायतीने परिसरातील सर्व गळतीचे कामे त्वरीत पूर्ण करून धोकादायक खड्डा बुजवावीत. तसेच बॅरेक्टस लावण्याकडे टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
चूक कुणाची आणि त्रास कोणाला
वास्तविक खदाई केल्यानंतर काम पूर्ण होणार नसल्याने ग्रामपंचयतीने याभोवती बॅरेकेट्स लावणे आवश्यक होते. परंतू असे केले नसल्याने एक निष्पाप मुलगा जखमी झाला. यामुळे त्यांच्यासह कुटूंबियांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चुक कुणाची आणि त्रास कोणाली अशी स्थिती झाली आहे.