बेंगळुरातील व्यावसायिकांच्या घर, कार्यालयांवर छापा : 15 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
मोठ्या प्रमाणावर कर चुकविणाऱ्या व्यावसायिकांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. अधिकाऱ्यांनी सोने व्यापाऱ्यांसह व्यावसायिकांना टार्गेट केले असून बुधवारी सकाळी 15 हून अधिक ठिकाणी छापा टाकून करचोरी उघडकीस आणली आहे. सोन्याची दुकाने, मेडिकल दुकाने, हॉस्पिटल मालकांची घरे आणि उद्योग संस्थांच्या मालकांच्या घरांवर छापे टाकून उत्पन्नाच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे.
चेन्नई आणि दिल्ली येथून 15 हून अधिक आयटी अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी रात्रीच बेंगळुरात दाखल झाले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी व्यापारी आणि सोने व्यावसायिकांची निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापे टाकत फायलींची झडती घेतली. बेंगळूरच्या जयनगर, बीटीएम लेआउट, सदाशिवनगर, विजयनगर, प्रशांतनगर येथील डॉक्टरांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे तपासली आहेत.
मेक्री सर्कलजवळील गजराजा ज्वेलर्सवर छापा टाकण्यात आला असून दुकानाचे दरवाजे बंद करून अधिकारी कागदपत्रे तपासत आहेत. शांतीनगरातील व्यावसायिक नवीन यांच्या घरावरही आयटीने छापा टाकला. दोन इनोव्हा कारमधील 8 आयटी अधिकारी नवीन यांच्या शांतीनगर येथील मोठ्या आलिशान बंगल्यातील महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. मेक्री सर्कलजवळील गजराजा ज्वेलर्स, सदाशिवनगर येथील श्री गणेश ज्वेलर्स येथे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी दुकानाचा दरवाजा बंद करून कर चोरीच्या फायली शोधून काढल्या आहेत. 2 इनोव्हा कारमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांनी व्यापक तपासणी केली.
आयटी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांच्या मालकीच्या कंपन्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात तपासणी केली. मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरीच्या तक्रारिंच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी हा छापा टाकण्यात आला आहे. 27 सप्टेंबर रोजीही आयटी अधिकाऱ्यांनी बेंगळुरातील विविध ठिकाणी छापा टाकला होता. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









