कोल्हापुर :
जिल्ह्यांतील खाजगी प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेतून पगार मिळण्यांसाठी शिक्षक कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये राष्ट्रीयकृत बँक निवडण्यास मुभा मिळावी व तशी सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांचेकडे केली. या बाबतचे निवेदन त्यांना देण्यासाठी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आले. यावेळी शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगुले उपस्थित होते .
शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सप्टेंबर महिन्याचे वेतन CMP प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या केडीसीसीच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. याबद्दल आम्ही शासनाचे व वेतन पथक प्राथमिक कोल्हापूरचे अभिनंदन करतो. पण राष्ट्रीयकृत बँकांनी पगारदार नोकरांदारांसाठी ज्या विविध योजना तसेच सवलती लागू केलेल्या आहेत या सवलती जिल्हा मध्यवर्ती बँके मार्फत देण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शिक्षकांना वेतन खाते काढलेमुळे मिळणारे अधिक लाभ घेण्यासाठी त्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होणे गरजेचे आहे. ते होण्यासाठी त्यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये त्यांना राष्ट्रीयकृत बँक निवडण्यासाठी मान्यता द्यावी व तशा प्रकारची दुरुस्ती शालार्थ प्रणाली मध्ये करावी.”अशी मागणी केली आहे. महेश चोथे यांनी तात्काळ हे निवेदन शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक ( प्राथ ) पुणे यांच्याकडे पाठवून दिले आहे.
महाराष्ट्र राज्य खा .प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने भेटलेल्या या शिष्टमंडळांत राज्याध्यक्ष भरत रसाळे यांचेसह शिवाजी सोनाळकर, सर्जेराव नाईक, आप्पासाहेब वागरे, एस. एम . पाटील व विश्वजीत पाटील उपस्थित होते .









