कन्नोळी येथील घटना : सावळगी पोलिसांत घटनेची नोंद
जमखंडी : शेततळ्यात पडलेल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या आई व मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कन्नोळी (ता. जमखंडी) येथे सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. बुद्धव्वा ऊर्फ महादेवी रेवणसिद्धप्पा हालहल्ली (वय 37), पूजा रेवणसिद्धप्पा हालहल्ली (वय 13) अशी दुर्देवी मृतांची नावे आहेत. घटनेविषयी अधिक माहिती अशी, रेवणसिद्धप्पा हालहल्ली हे शेतकरी असून त्यांनी शेतात तळे निर्माण केले होते. त्या भागात त्यांची पाच वर्षांची श्रेया खेळत होती. अचानक तिचा तोल गेल्याने ती तळ्यातील पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी शेजारीच असणारा भाऊ सचिन याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलीला वाचविण्यासाठी बुद्धव्वा धावून गेल्या. त्या पाठोपाठ पूजाही गेली. त्यावेळी त्यांनी श्रेयाला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींचाही पाण्यात तोल गेल्याने त्याही पाण्यात पडल्या. या प्रयत्नात श्रेयाला पाण्यातून बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. मात्र बुद्धव्वा व पूजा या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
एका मुलीवर उपचार सुरू
नागरिकांनी श्रेयाला दवाखान्यात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सावळगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.









